अमरावती : वरूडनजीकच्या महेंद्री जंगलात शेकदरी गव्हाणकुंड वनबीटमध्ये २२ डिसेंबर रोजी एक चार ते पाच वर्षीय नर बिबटाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी २४ डिसेंबर रोजी तीन आरोपींना अटक केली असून, महाराष्ट्र- मध्यप्रदेश सीमावर्ती भागात घोड्यावरून अवैध दारू वाहतुकीसाठी हा बिबट अडसर ठरत असल्यामुळे त्याचा ‘गेम’करण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिली. यातील पाच आरोपी पसार असून, त्यांचा शोध पोलीस, वनविभाग संयुक्तपणे घेत आहे.
महेंद्री जंगलात संशयास्पद मृतावस्थेत बिबट आढळून आला होता. या बिबट्यावर तीक्ष्ण वार करून हत्या करण्यात आली, असा अहवाल पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यानंतर अमरावतीचे उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला, सहायक वनसंरक्षक लिना आदे-गोंडाने यांच्या मार्गदर्शनात वरूड वनविभागाच्या चमुने बिबट्याच्या मारेकऱ्यांचा शोध घेतला. दरम्यान मध्यप्रदेश पोलिसांची मदत घेण्यात आली. बिबट हत्याप्रकरणी वरूङनजीकच्या भेंबडी येथील दोन तर, मध्यप्रदेशच्या मुलताई तालुक्यातील कुणबीखेडा येथील एक असे तिघांना ताब्यात घेण्यात आले. भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ अन्वये आरोपींविरूद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. २४ ते २८ डिसेंबर दरम्यान आरोपींना न्यायालयाने वनकोठडी सुनावली होती. सोमवारी या तीनही आरोपींची ९ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. ही कारवाई वरूडचे आरएफओ प्रशांत लांबाडे, वनपाल अजय खेडकर, ए.एन. नवले, भारत भूषण, मधू बेलकर, मंगेश जंगले, विजय चौधरी, शैलेजा वाकपांजर आदींनी केली आहे.
---------------------
अवैध दारू वाहतुकीने घेतला बिबट्याचा बळी
मध्यप्रदेश- महाराष्ट्र सीमेवर अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री, वाहतूक होत असल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाया केल्या आहेत. मात्र, घोड्यावरून दारू वाहतुकीसाठी बिबट्याचा धोका वाढल्याने भीतीपोटी दारू विक्रेत्यांनी बिबट्याचा तीक्ष्ण शस्त्राने हत्या केली. याप्रकरणी पसार पाच आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच त्यांना जेरबंद केले जाईल, अशी माहिती वनविभागाने दिली आहे.
----------------------
कोट
बिबट हत्याप्रकरणी तिघांना अटक करून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पुन्हा पाच आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. त्यामुळे आरोपींची नावे उघड करता येत नाही.
- लिना आदे- गोंडाणे, सहायक वनसंरक्षक, अमरावती