अमरावती : डोळ्यात मिरचीपुड फेकून चाकूहल्ला करीत १९ लाख ५० हजारांची रोख लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन लुटारुंना ४८ तासांत अटक करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले.
पोलीससूत्रानुसार, अनिकेत ज्ञानेश्वर जाधव (२४, रा. अकोली), साहिल नरेश मेश्राम (२२ रा. माताफैल बडनेरा) व यश सुनील कडू (२४ रा. जेवडनगर) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी लुटमारीच्या घटनेची कबुली दिली असून, या प्रकरणाची चौकशी पोलीस करीत आहे. गुन्हा घडल्यानंतर कोतवाली पोलिसांनी घटनास्थळासह विविध परिसरातील तब्बल ३० ते ४० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपी अनिकेतच्या हालचालीवर पोलिसांना संशय आला. तसेच सीसीटीव्हीत कैद झालेल्या आरोपींच्या चेहऱ्यावरून आरोपींची नावे निष्पन्न केली. पोलिसांनी सायबर ठाण्यातील पोलिसांची मदत घेतली. त्यानंतर पोलीस आयुक्त आरती सिंह व पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, एसीपी शिवाजी धुमाळ यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल आठवले, दुय्यम ठाणेदार विवेकानंद राऊत यांच्या नेतृत्वात पीएसआय श्रीकांत नारमोडे, रवींद्र काळे, पोलीस कर्मचारी जुनेद खान, शैलेश लोखंडे, आशिष विघे आणि उमाकांत आसोलकर यांच्या पथकाने आरोपींना शिताफीने अटक केली. यापैकी अनिकेतला त्याच्या घरून, तर साहिल व यशला पळून जाताना बडनेरा रेल्वे स्टेशहून ताब्यात घेतल्याची माहिती ठाणेदार राहुल आठवले यांनी दिली.
बॉक्स
कुरियर कर्मचाऱ्याने दिली टीप
आरोपी अनिकेत जाधव हा साईनगरातील एक्सप्रेस बीस कुरीअरमध्ये काम करतो. त्यामुळे त्याला रेडियंट कॅश मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीच्या कॅश कलेक्शनची इत्थंभूत माहिती होती. मनोज चौधरी हा केव्हा व कुठे जातो, कुठून किती रोख जमा करतो, अशाप्रकारची सर्व माहिती अनिकेतजवळ होती. त्यामुळे त्याने मनोज चौधरी रोख घेऊन जात असल्याची माहिती त्याच्या तीन साथीदारांना दिली. त्यानुसार अनिकेत हा मालविय चौकात मनोज चौधरीवर लक्ष ठेवून होता. त्याची माहिती तो साथीदारांना देत होता. त्यानंतर संचारबंदीचा फायदा घेऊन आरोपींनी मालवीय चौक परिसरात मनोजला लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न आरोपींचा फसला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन आरोपी दिसत आहेत. त्यापैकी दोघांना अटक केली. तिसऱ्याचा शोध पोलीस घेत आहे. आतापर्यंत चार आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. यशवर राजापेठ, तर साहिलवर बडनेरा ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.