अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरिओम कॉलनी येथे घराचे दार तोडून २३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख दोन लाख रुपये असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. चोरट्यांकडून चारचाकी वाहनासह १६ लाख १० हजारांचा मुद्देमाल गुरुवारी गुन्हे शाखेने जप्त केला.
गौरव गजानन कांबे (२३, रा. राठीनगर), आकाश प्रकाश रंगारी (२६, रा. शेगाव-रहाटगाव रोड), अमित राजेंद्र वानखडे (२५, रा. भीमनगर, शिवाजीनगर) असे अटकेतील आरोपींची नावे आहे. हरिओम कॉलनी येथील श्रीकृष्ण नत्थूजी वाहुरवाघ (५३) यांच्या फिर्यादीनुसार घरी कोणीही नसल्याचे साधून अज्ञातांनी घराचे मागील दार तोडून आत प्रवेश केला. कपाटातील २३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख दोन लाख रुपये चोरीस गेले होते. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांत भादंविचे कलम ४५७, ३८० व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गोपनीय
माहितीच्या आधारे तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यात आरोपी गौरव कांबे याच्याकडून तीन लाखांचे ६० ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख ६० हजार रुपये असा एकूण ३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आकाश रंगारी याच्या ताब्यातून ४ लाख ७५ हजारांचे ९५ ग्रॅम वजनाचे दागिने, तर अमित वानखडे याच्या ताब्यातून १ लाख ७५ हजारांचे ३५ ग्रॅम दागिने असे एकूण ९ लाख ५० हजार रुपयांचे दागिने तर, गुन्ह्यात वापरलेले एम.एच. २७ एसी ३७६३ क्रमांकांचे चारचाकी वाहन एकूण १६ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
००००००००००००००००००००००००००००००