मोहन राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: कोरोनानंतर सर्व स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असताना इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील साडेतीन हजार स्कूल बसमालक व चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. खासगी बँका तसेच फायनान्स कंपनीच्या हप्त्यावर घेतलेल्या स्कूल बसचे हप्ते थकीत राहिले. परिणामी अनेक स्कूल बस फायनान्स कंपनीने जप्त केल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी खासगी शिक्षण संस्थेमार्फत इंग्रजी माध्यमाच्या प्ले स्कूल पासून तर इयत्ता आठवीपर्यंत शाळा चालविल्या जातात. अनेक विद्यार्थी शाळांनी उपलब्ध केलेल्या स्कूल बस किंवा इतर स्कूल खासगी शालेय बसने ये-जा करतात. ग्रामीण भागातील काही ऑटोरिक्षा विद्यार्थ्यांना शाळेत आणतात. मात्र, कोरोनामुळे मागील सात महिन्यांपासून शाळा बंद आहे. परिणामी सर्व स्कूल बसला ब्रेक लागले आहे.
कर्ज हप्ते न भरल्याने स्कूल बस जप्त
खासगी शिक्षण संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांना ने- आण करण्यासाठी कर्ज काढून स्कूलबस खरेदी केल्या. परंतु शाळा बंद असल्याने स्कूल बस एकाच ठिकाणी उभ्या आहेत. एक किंवा दोन महिने कर्ज भरण्याची तडजोड करता येईल. मात्र, तब्बल सात महिन्यांपर्यंत हप्ते भरण्याची रक्कम जमा करणे कठीण झाले आहे. स्कूलबसच्या कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे अनेक खासगी फायनान्स कंपन्यांनी स्कूलबस जप्त केल्या आहेत.
मालक - चालकावर उपासमारीची वेळ
शहरी भागातील शाळेत विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी ग्रामीण भागातील काही मालकांनी फायनान्सवर स्कूल बस व ऑटोरिक्षा खरेदी केल्या. मात्र, सात महिन्यात सर्व यंत्रणा ठप्प असल्याने उत्पन्नाचे स्रोत थांबले. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कुटुंब जगविण्यासाठी या चालक-मालकांची धडपड सुरू आहे. शासनाकडून आधार देण्याची मागणी या कुटुंबीयांनी केली आहे.
मागील सात महिन्यंपासून स्कूलबस उभी आहे. कर्जाचे हप्ते भरण्यासाठी कसरत करावी लागत आहे. शासनाने आर्थिक मदत द्यावी.
- विनोद कुर्जेकार, अंजनसिंगी
-------------