रिद्धपूर (अमरावती) : शिरखेड (ता. मोर्शी) पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिद्धपूर येथून २० नोव्हेंबर रोजी समाज माध्यमावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट उजेडात आल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना होती. या प्रकरणी संशयित आरोपी शाहरूख खान इस्राईल खान (२५, रिद्धपूर) याला सोमवारी अटक करण्यात आली. यानंतर ही पोस्ट स्टेटसवर बाळगणाऱ्या आणखी दोघांना शिरखेड पोलिसांनी मंगळवारी अटक केली. शाहरूखला न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले आहे.
शिरखेडचे ठाणेदार सूरज तेलगोटे यांच्या मार्गदर्शनात २० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता शाहरूख खान याला अटक करून मोबाइल जप्त केला. या प्रकरणाची फिर्याद पोलिस हवालदार संजय वाघमारे यांनी नोंदविली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना शाहरूखचे रिद्धपूर येथील मित्र अब्दुल जमील अब्दुल कबीर (१९) व तन्जील अहमद अब्दुल नईम (१८) यांनीसुद्धा आक्षेपार्ह पोस्टचे स्टेटस व्हॉट्सॲपला बाळगल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे २१ नोव्हेंबर रोजी या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. शाहरूखला २१ नोव्हेंबर रोजी मोर्शी न्यायालयापुढे हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. अटकेतील त्याच्या मित्रांकडून शिरखेड पोलिस कसून तपास करीत आहेत.
अमरावती जिल्ह्यात या प्रकरणाचे पडसाद उमटले असून, बुधवारी हिंदुत्ववादी संघटनांच्या आवाहनावरून जिल्हा बंद पाळण्यात आला. मोर्शी, चांदूर बाजार, दर्यापूर शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद होती. याशिवाय इतर ठिकाणीही या घटनेचा निषेध करणारी निवेदने प्रशासनाकडे देण्यात आली.