एक लाखांचा माल लंपास : चोरटे सीसीटीव्हीत कैदअमरावती : जवाहर मार्गावरील तीन व्यापारी प्रतिष्ठाने रविवारी मध्यरात्री फोडण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी तीनही प्रतिष्ठांतील साहित्य व रोख असा एकूण एक लाखांचा माल लंपास केला आहे. सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असून शहर कोतवाली पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. शहरातील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने रविवारी बंद असल्यामुळे चोरट्यांनी संधी साधून जवाहर मार्गावरील तीन प्रतिष्ठाने एकाच रात्रीत फोडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. सिन्ध होजीअरीचे संचालक हितेश हरवानी (३८, रा. दरोगा प्लॉट), सपना एम्पोरियमचे विजय लुल्ला (रा. फरशी स्टॉप) व लक्ष्मी श्रृंगार आत्माराम पुरस्वामी (फरशी स्टॉप) सोमवारी सकाळी प्रतिष्ठाने उघडण्यासाठी आले असता त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती शहर कोतवाली पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यामध्ये सिन्ध होजीअरीतून चोरांनी रोख व कपडे असा एकूण ९० हजारांचा माल लंपास केला. सपना एम्पोरियममधून १४ हजाराचा तर लक्ष्मी श्रृंगारमधून १ हजार ५०० रुपयांचा माल लंपास केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तीनही प्रतिष्ठानांतील सीसीटीव्हीची तपासणी केली असता दोन ते तिन चोरटे चोरी करताना आढळून आले. तीनही प्रतिष्ठानांतील वरील मजल्यावरील दारे तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे निदर्शनास आले आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्यामध्ये एकाने डोक्यात टोपी, दुसऱ्याने प्लॅस्टिकची पन्नी व तिसरा साधा वेशभूषेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांच्या मदतीने तपासकार्य सुरू केले असून अद्यापपर्यंत आरोपीचा सुगावा पोलिसांना लागला नाही. मात्र, सीसीटीव्ही फुटेजवरून चोरांचे शोधकार्य पोलिसांनी सुरु केले आहे. (प्रतिनिधी)
जवाहर मार्गावरील तीन व्यापारी प्रतिष्ठाने फोडली
By admin | Published: August 25, 2015 12:14 AM