लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक गर्ल्स हायस्कूल चौकालगत मॉलसमोर उभ्या तीन कार अचानक जळून बेचिराख झाल्या. ही घटना गुरुवारी रात्री १० च्या सुमारास घडली. फटाक्यांच्या स्फोटाने ही आग लागली असावी, अशी शंका वर्तविली जात आहे. यात सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.शहरातील छत्री तलाव मार्गावरील शिवकृपा कॉलनी येथील रहिवासी हितेश नानवानी यांच्या मालकीची कार क्रमांक एम.एच २७ बी.व्ही. ३९६४, श्रीकृष्ण पेठ येथील रोहन चिमोटे यांची एम.एच २७ बी. व्ही. ४७४९ क्रमांकाची कार तसेच चपराशीपुरा परिसरातील सागरनगर येथील नावेद खान यांच्या मालकीची एम.एच. २७-५६५० क्रमांकाची कार आगीत बेचिराख झाल्या. या तिन्ही कार पार्किंग करून समोरील हॉटेलमध्ये संबंधित व्यक्ती जेवण करायला गेल्या होत्या.काही वेळातच एम.एच २७ बी. व्ही. ४७४९ या क्रमांकाच्या कारमधून धूर निघत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर क्षणातच आजूबाजूला असलेल्या दोन्ही कार आगीच्या विळख्यात सापडल्या. वाहनांना अचानक मोठी आग लागल्याचे लक्षात येताच मॉलमधील सुरक्षा रक्षकांनी महापालिका अग्निशमन विभागाला पाचारण केले. परंतु, आगीने रौद्र रूप धारण केले होते. रस्त्याच्या कडेला पार्किंग करण्यात आलेल्या अन्य वाहनेदेखील आगीच्या विळख्यात येण्याची भीती होती. मात्र, समयसूचकता साधून उभ्या असलेल्या कारसह अन्य वाहने त्वरित हटविण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.अग्निशमन विभागाने पेटत्या कार विझविण्यासाठी पाण्याच्या तीन बंबांचा वापर केला. आग विझली, मात्र या तिन्ही कार आगीच्या विळख्यात जळून खाक झाल्यात. गाडनेनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन जळालेल्या तिन्ही कारचा पंचनामा केला. या कार कशामुळे जळाल्यात, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, दिवाळीनिमित्त उडविण्यात आलेल्या फटाक्यांंच्या स्फोटाने ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविला गेला आहे.
तीन कार जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2018 9:56 PM
स्थानिक गर्ल्स हायस्कूल चौकालगत मॉलसमोर उभ्या तीन कार अचानक जळून बेचिराख झाल्या. ही घटना गुरुवारी रात्री १० च्या सुमारास घडली. फटाक्यांच्या स्फोटाने ही आग लागली असावी, अशी शंका वर्तविली जात आहे. यात सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
ठळक मुद्देगर्ल्स हायस्कूल चौकातील घटना : फटाक्यांनी आग लागल्याची शंका