लाईटिंग कंत्राटदाराविरुद्ध कारवाई : रुद्रेश मंगल कार्यालयासमोरील घटनाअमरावती : लग्न समारंभातील मिरवणुकीत लाईटिंग हाती घेणाऱ्या ३ बाल कामगारांची सुटका करण्यात आली. सरकारी कामगार अधिकारी, चाईल्ड लाईन व राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प अधिकाऱ्यांनी सोमवारी नवाथेनगरस्थित रुदे्रश मंगल कार्यालय ते रंगोली हॉटेलदरम्यान ही कारवाई केली. या कारवाईत जय बालाजी लाईटिंग अॅन्ड रथचे संचालक सुभाष साहू यांना राजापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तिन्ही मुलांना बाल निरीक्षण गृहात पाठविण्यात आले आहे. १४ वर्षांखालील बालकांकडून कुठल्याही श्रेत्रात काम करून घेण्यास शासनाने प्रतिबंध लावला आहे. मात्र, शहरात अजूनही अनेक व्यापारी फायद्यासाठी बाल कामगारांचा वापर करीत आहेत. सोमवारी रुद्रेश मंगल कार्यालयातील लग्न समारंभाच्या मिरवणुकीत नवरदेव रथावर बसलेले होते. त्याच्यासमोर डीजेच्या तालावर वऱ्हाड नाचत मारोतीवर जात होते. याच मिरवणुकीत तीन बालकामगाराच्या हातात लाईटिंगच्या छत्र्या आढळल्या. याची माहिती चाईल्ड लाईनला मिळताच त्यांनी सरकारी कामगार अधिकारी डी.बी.जाधव यांना कळविले. त्यानुसार जाधव यांच्यासह राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाचे संचालक प्रविण येवतीकर, प्रकल्प व्यवस्थापक पंकज देशमुख, चाईल्ड लाईनचे अजय देशमुख व राजापेठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तिन्ही बालकामगारांची चौकशी केली. ते १४ वर्षांच्या आतील असल्याचे कळले तसेच ते बालकामगार साहू यांच्याकडे १०० रुपये रोजंदारीने ठेवल्याचे निदर्शनास आले. तेथून तीन्ही बालकामगारांना त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधिन करण्यात आल्याची माहिती डी.बी.जाधव यांनी दिली. याप्रकरणात साहू यांच्याविरुद्ध अधिनियम २०१६ ची कलम ३ चा भंग झाल्याची कारवाई करण्यात आली.२० हजारांचा दंड, दोन वर्षांची शिक्षा१४ वर्षांआतील मुलांकडून कुठल्याही क्षेत्रात काम करून घेण्यास प्रतिबंध आहे. असे आढळून आल्यास बाल कामगार अधिनियम १९८६, सुधारणा अधिनियम २०१६ ची कलम ३ चा भंग होतो. ही बाब सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीला २० हजारांचा दंड व दोन वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे बालकामगार ठेवणे हे कायद्याने गुन्हा असून याकडे नागरिकांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी डी.बी.जाधव यांनी केले.
लग्न समारंभातील मिरवणुकीतून तीन बालकामगारांची सुटका
By admin | Published: April 19, 2017 12:09 AM