फोटो पी १७ विदर्भ मिल
परतवाडा : स्थानिक विदर्भ मिल कॉलनीत, एकमेकांच्या शेजारी असलेल्या तीन कोरोना संक्रमितांचा एकाच दिवशी अवघ्या १२ तासांत थोड्याफार अंतराने मृत्यू झाला.
या कॉलनीतील एकाच ओळीत या तिघांची घरे एकमेकांना लागून आहेत. दरम्यान याच ओळीतील अन्य चार कोरोना संक्रमित आणि त्यांची प्रकृती बरी नसल्याची माहिती आहे. दगावलेल्या त्या तीन कोरोना संक्रमितांमध्ये एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. यातील दोघांवर घरून, तर एकावर परस्पर दवाखान्यातून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. यातील महिलेच्या मृतदेहाला दफन केले गेले. अन्य दोघांना भडाग्नी दिला गेला.
सूत्रांनुसार, यातील ती महिला व एक पुरुष कोरोना संक्रमित निघाल्यानंतर त्यांचेवर औषधोपचार केल्या गेलेत. यानंतर ते दवाखान्यातून बरे होऊन घरी परतलेत. घरी असताना त्या पुरुषाची प्रकृती खालावली. तेव्हा त्याला अन्य एका खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. तेथेच सोमवार, १७ मे रोजी सकाळी ११ वाजता दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. याच्या एक तास आधी दुसरा कोरोना संक्रमित रुग्ण ज्यांचा परतवाडा येथील खासगी कोविड रुग्णालयात उपचार सुरू होता तो दगावला. त्याच घरी असलेल्या महिलेची आठ तास आधी घरीच प्राणज्योत मालवली.
घराला घर लागून असलेल्या या तीन शेजाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या मृत्यूची माहिती मिळताच अचलपूर नगरपरिषदेकडून त्या परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले. विदर्भ मिल परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या परिसरात ५० चे वर कोरोना संक्रमित रुग्ण अवघ्या १० दिवसांत नोंदविल्या गेले आहे. दरम्यान कोरोना रुग्णांना डेडिकेटेड कोविड रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. यात प्रशासनाने शहरात ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी. वाढती रुग्णसंख्या पाहता पर्यायी परिणामकारक व्यवस्था गोरगरिबांकरिता उपलब्ध करून देण्याची मागणी माजी नगरसेवक अभय माथने यांनी केली आहे.