येवदा-पथ्रोट-चिखलदरा : येवदा पोलीस ठाण्यात खासगी इलेक्ट्रिशियनचा, काकडा येथे मामाच्या घरी आलेल्या १२ वर्षीय भाचीचा आणि प्राण्यांसाठी लावलेल्या शेताच्या वीजप्रवाही कुंपणाला स्पर्श होऊन मोथाखेडा येथे महिलेचा मृत्यू झाला. गत २४ तासांतील या घटना आहेत.
--------------------
येवद्यात युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
फोटो - धामणकर २५ पी
येवदा : स्थानिक पोलीस ठाण्यात विद्युत दुरुस्ती करताना ३२ वर्षीय युवकाचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. मनोज धामणकर असे मृताचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनुसार, मनोज हा खासगी विद्युत दुरुस्तीची कामे करीत होता. पोलीस ठाण्यातील विद्युत दुरुस्तीची सर्व कामे तो बऱ्याच वर्षांपासून करीत होता. याच कामानिमित्त तो शनिवारी येवदा पोलीस ठाण्यात गेला होता. रात्री आठच्या सुमारास जिवंत विद्युत वाहिनीला त्याचा स्पर्श झाला. यामुळे गंभीर जखमी झाल्याने घटनास्थळी असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याला तत्काळ येवदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. प्रथमोपचारानंतर त्याला दर्यापूर ग्रामीण रुग्णालयात हलविले. त्यानंतर त्याला अमरावती येथे नेण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याच्या पश्चात दोन मुले व पत्नी असा आप्त परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने व त्यातच हलाखीची परिस्थिती असल्याने धामणकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या कुटुंबाला शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
----------मनोजच्या मनमिळावू स्वभावामुळे बऱ्याच वर्षांपासून पोलीस ठाण्यातील छोटे-मोठे विद्युत दुरुस्तीचे काम त्याला मिळत होते. त्याच्या नेहमी येण्या-जाण्याने तो आमच्या परिवारातील सदस्यासारखाच होता. त्याच्या या अचानक जाण्याने आम्हालासुद्धा धक्का बसला आहे.
- अमूल बच्छाव, ठाणेदार, येवदा पोलीस ठाणे
-----------------
काकडा येथे मुलीचा मृत्यू
फोटो - पटोकार २५ पी
पथ्रोट : मामाच्या घरी आलेल्या भाचीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना पथ्रोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काकडा गावात रविवारी सकाळी घडली.
सूत्रांनुसार, सुजिता साहेबराव गायगोले (वय १२, रा. धनेगाव) असे मृताचे नाव आहे. ती काकडा येथे मामा धम्मपाल वानखडे यांच्याकडे आली होती. सकाळी अंघोळीकरिता पाणी गरम करण्याच्या हिटरच्या क्वाॅईलला स्पर्श झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पथ्रोट ठाण्याला मिळताच पोलीस उपनिरीक्षक अरुण बरडे, अशोक पळसपगार, हेमंत येरखडे, कहाणे, पोलीस पाटील महादेव खडसे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. गायगोले कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. मृत सुजिताच्या पश्चात आई-वडील, बहीण व भाऊ आहे. वृत्त लिहिस्तोवर शवविच्छेदन झाले नव्हते.
------------------
मोथाखेडा येथे महिलेचा मृत्यू
चिखलदरा : वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी एका शेतात लावण्यात आलेल्या जिवंत विद्युत तारेचा स्पर्श होऊन महिलेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील मोथाखेडा येथे शनिवारी रात्री घडली.
लाडीकीबाई सानू सावलकर असे मृत महिलेचे नाव आहे. स्वतःच्या शेताची राखण करण्यासाठी ती निघाली होती. रात्रीच्या अंधारात शेजारील शेतकऱ्याने वन्यप्राण्यांपासून पीक संरक्षणासाठी लावलेली जिवंत विद्युत तार तिच्या निदर्शनास आली नाही. तिला स्पर्श झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. गाव चिखलदरा तालुक्यातील, तर पोलीस ठाणे धारणी असल्याने तेथील पोलिसांनी शेतकऱ्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला.