-वैभव बाबरेकरअमरावती : जीवघेण्या स्वाईन फ्लूने विभागातील तीन जणांचे मृत्यू झाले. अद्यापही १७ रुग्णांवर औषधोपचार सुरू आहे. या आजाराने अमरावती व अकोला जिल्ह्यात पाय पसरल्याचे आढळून आले आहे. मात्र, आरोग्य विभागातर्फे अद्याप ठोस पावले उचलली गेली नसल्याचे चित्र आहे. ऊन व थंडी अशा वातावरणाच्या बदलामुळे विदर्भ व्हायरलच्या विळख्यात सापडला आहे. त्यातच वातावरण बदलल्यामुळे स्वाईन फ्लूसारख्या जीवघेण्या आजाराच्या विषाणुचाही प्रकोप हळूहळू वाढू लागला आहे. गतवर्षात स्वाईन फ्लूने विभागात कहरच केला. शासकीय व खासगी रुग्णालयांतील चार ते पाच जणांचे मृत्यूदेखील झाले. तब्बल १२५ रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. आता पुन्हा स्वाईन फ्लूने पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. विभागातील अमरावती, अकोला, यवमताळ, बुलडाणा व वाशिम येथील आरोग्यविषयक कामकाज अकोला येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत चालते. या कार्यालयातील नोंदीनुसार, जानेवारी ते फेब्रुवारीअखेरपर्यंत अमरावती व अकोला जिल्ह्यातल स्वाईन फ्लूचे १७ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय अमरावती येथील दोन व अकोट येथील एकाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. या आजारावर प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. त्या अनुषंगाने जनजागृती सुरू केली आहे. आजारी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना टॅमी फ्लू गोळ्याद्वारे औषधोपचार सुरू करण्यात आला आहे.
आठ हजार टॅमी फ्लूचे वाटपआरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत पाचही जिल्ह्यांतील जिल्हा सामान्य रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुमारे आठ हजार टॅमी फ्लू गोळांचा पुरवठा करण्यात आला आहे. स्वाईन फ्लू संशयितांवर टॅमी फ्लूचा उपचार सुरू आहे.
इर्विन रुग्णालयात दोन संशयितअमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारी स्वाईन फ्लूचे दोन संशयित रुग्ण दाखल झाले. त्यांचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
दोन महिन्यांत स्वाईन फ्लूने तिघांचा मृत्यू झाला. १७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. या आजाराच्या प्रतिबंधसाठी जनजागृती सुरू आहे. पाचही जिल्ह्यांतील रुग्णालयांत टॅमी फ्लू गोळांचा पुरवठा केला आहे. डॉ. आर.एफ. फारुकी, आरोग्य उपसंचालक, अकोला