कोरोना काळातही सुरक्षित
प्रकृती ठणठणीत, कोरोनाची बाधा नाही, निरामय आयुष्य
फोटो - शिसोदे, ढेमरे नावाने तीन फोटो
मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : एकीकडे वयाची चाळिशी गाठली की, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, चक्कर येणे, घाम येणे असे अनेक आजार बळावतात. मात्र, ९९ व्या वर्षी नायगाव येथील तीन कुटुंबप्रमुखांना ना बीपीची गोळी, ना शुगरचे इंजेक्शन घ्यावे लागते. निरामय आयुष्य जगत नायगावचे ते कुटुंबप्रमुख शतकाकडे वाटचाल करीत आहेत.
दीड वर्षात सूक्ष्मदर्शकानेही निदर्शनास न येणाऱ्या कोरोना विषाणूने दुसऱ्या लाटेत तालुक्यात ४५ वर्षांच्या आतील १८ जणांचा मृत्यू झाला. शासनाची त्रिसूत्री पाळल्याने अनेक कुटुंब या महामारी पासून कोसो दूर राहिले. तथापि, नायगाव येथील रमेशचंद्र गुलाबराव शिसोदे, प्रतापसिंह गुलाबराव शिसोदे, बाबाराव पांडुरंग ढेंमरे हे तीन कुटुंबप्रमुखांना या संसर्गाचीही बाधा झाली नाही. हे तिघेही आता वयाची शंभरी गाठतील. नियमित व्यायाम, योग्य आहाराचा वापर त्यामुळे शंभर वर्षापर्यंत आयुष्य जगता येते, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांना आजपर्यंत कोणताही आजार जडला नाही. पूर्वीसारखाच मिरचीचा ठेचा, ज्वारीची भाकर त्यांच्या आहारात आहे. पहाटे साडेपाच वाजता उठणे, गावाला पायीच चक्कर घालणे, वृत्तपत्राचे वाचन, सकाळी साडेदहा वाजता जेवण, दुपारी आराम, सायंकाळी सात वाजता जेवण, तर रात्री साडेदहाला झोपणे असा त्यांचा नित्यक्रम आहे. तिघेही टीव्ही आणि मोबाईलपासून कोसोदूर आहेत.
सत्यशोधक चळवळीच्या आठवणींना मिळाला उजाळा
विदर्भात सत्यशोधक समाजाची चळवळीचे महूर्तमेढ रोवणारे गुलाबराव शिसोदे यांची मुले रमेशचंद्र व प्रतापसिंह हे त्याकाळात या चळवळींत वडीलाच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय आहे. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास आम्ही बालपणी सुरुवात केली होती, अशा अनेक आठवणीना हे बंधू उजाळा देतात. इंग्रजांच्या राजवटीत झालेले अत्याचार लहानपणी अनुभवले. घोड्यावर बसून गावोगावी ग्रामस्थांना आजारावर आयुर्वेदिक औषध आपण देत असू, अशा आठवणी बाबाराव ढेंमरे यांनी सांगितल्या.