अमरावती : जिल्ह्यात ८ ऑक्टोबरपासून सलग दोन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यांपैकी मोर्शी तालुक्यात दोघांनी आत्महत्या केली, तर चांदूर बाजार तालुक्यातील एका शेतकऱ्याने जीवन संपविले.
मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथील प्रवीण रामकृष्ण हरणे (३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून ८ ऑक्टोबर रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वृद्ध आई-वडील आहेत. ९ ऑक्टोबर रोजी सावरखेड पिंगळाई येथील युवा शेतकरी गोपाल मुकुंदराव तायडे (५०) या शेतकऱ्याने कर्जापायी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याकडे मौजा सावरखेड पिंगळाई शिवारात दहा एकर शेती आहे. त्या शेतात त्यांनी कपाशी व सोयाबीनचे पीक पेरले होते. शेती उभी करण्यासाठी त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक आणि खासगी फायनान्स कंपनीचे कर्ज घेतले होते. ९ ऑक्टोबर रोजी ते शेतात सोयाबीन सोंगण्यासाठी गेले होते. तेथेच सकाळी आठ वाजता दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, मुलगा आहे. मोठी मुलगी ही सावरखेड पिंगळाई गावची उपसरपंच आहे. गावात त्यांची चांगली प्रतिष्ठा होती. सावरखेड पिंगळाई या गावात गेल्या एक वर्षात चौथी शेतकऱ्याची आत्महत्या आहे.
चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील एका तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून सोमवारी दुपारी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ऋषिकेश नंदकुमार पारधी (३५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ऋषिकेश हा इलेक्ट्रिकल दुरुस्तीचे दुकान चालवीत होता; तसेच वडिलांच्या नावे असलेली ३८ आर शेती वाहत होता. त्यावर वडिलांच्या नावे चुकविता न आलेले कर्ज होते. या कर्जफेडीच्या विवंचनेला कंटाळून ९ ऑक्टोबर रोजी त्याने पेठपुरास्थित भाड्याच्या दुकानात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. अविवाहित असलेला ऋषिकेश हा कुटुंबातील एकुलता कमावता होता. त्याच्या पश्चात ६२ वर्षीय आई, धाकटा भाऊ व दोन बहिणी आहेत.