येवदा शिवारातील घटना,
येवदा : रानडुकरांच्या हल्ल्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन शेतकरी जखमी झाल्याची घटना येवदा शिवारात सोमवारी घडली.
येवदा येथील धनराज गावंडे (५०), विकास तिडके (३०) व रामगड येथील प्रेमदास भगत (५५) यांची येवदा शिवारात शेती आहे. दिवसभर शेतात थांबून परत येत असताना रानडुकरांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. धनराज गावंडे हे सर्वाधिक जखमी झाले आहे. त्यांच्या पायाचे मांस चिरले आहे. हातालाही जखमा करण्यात आल्या. रानडुकरावर त्यांनी काठीने हल्ला केला होता. त्यामुळे रानडुकराने चवताळून प्रतिहल्ला केला. विकास तिडके यांचा पाय जायबंद झाला, तर प्रेमदास भगत यांच्या हाताला किरकोळ जखम आहे. त्यांना आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी उपचारासाठी दाखल केले. येवदा प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होत आहेत. धनराज गावंडे यांच्या जखमांना २८ टाके घालण्यात आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, रानडुक्कर, हरिण, रोही, वानर यांसारखे प्राणी शिवारात शेतकऱ्यांना हैराण करून सोडत आहेत. रानडुकरांच्या हल्ल्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने त्यांना मारण्याकरिता शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.