अमरावती : तालुक्यातील सालोरा येथील झोपडपट्टी परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाल्याने तीन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. घरातील सर्व साहित्याची राखरांगोळी झाली असून तीनही कुटुंब उघड्यावर आले आहेत. घटनेची माहिती मिळताच माजी पालकमंत्री तथा आ. यशोमती ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबियांना आधार दिला.
सोमवारी सकाळी अकरा वाजता योगिता इंगळे या घरातील दिवाबत्ती करून बाहेरगावी गेल्या होत्या. दुपारी साडे बारा वाजताच्या दरम्यान त्यांच्या घरातील सिलेंडरचा अचानक स्फोट होऊन घरातील सर्व साहित्याने पेट घेतला.क्षणार्धात या आगीने आजूबाजूचे घर विळख्यात घेतले.यामध्ये प्रमोद बैसने,शोभाबाई सहारे योगिता इंगळे यांचे घर पूर्णपणे जळाले असून घरातील साहित्य देखील खाक झाले आहेत.परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यातआली नाही.
आ.यशोमती ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेऊन नुकसानग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली व त्यांना मानसिक आधार दिला.नुकसानग्रस्त कुटुंबियांना आ.यशोमती ठाकूर यांच्या वतीने तातडीची मदत करण्यात येणार असून शासनाच्या वतीने देखील नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. ठाकूर यांनी सांगितले.