अमरावती : विश्वास संपादन करून फिर्यादीला आरोपीने ओटीपी विचारला. त्यानंतर टप्प्याप्प्याने २ लाख ९५ हजार रुपये एसबीआय खात्यातून लंपास करून आर्थिक फसवणूक केल्याची घटना साईनगर येथे १० मार्च रोजी घडली.
याप्रकरणी सायबर पोलिसानी मंगळवारी दोन मोबाईलधारकांविरुद्ध भादंविचे कलम ४१९, ४२० सहकलम ६६(क), ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायदानुसार गुन्हा नोंदविला.
पोलीस सूत्रानुसार, आरोपीने फिर्यादीला फोन केला. बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून विश्वास संपादन केल्यानंतर फिर्यादीकडून त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी विचारून एसबीआय खात्यातून २ लाख ९५ हजार रुपयांनी गंडविले. यासंदर्भात फिर्यादी मंगेश सुधाकर मार्कंड (५०, रा. सुरश्री कॉलनी साईनगर) यांनी पोलिसात तक्रार नोंदविली. पुढील तपास सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर करीत आहेत.