- संदीप मानकर
अमरावती - आठवडाभरात झालेल्या दमदार पावसामुळे पश्चिम विदर्भातील मोठ्या प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. अमरावती, यवतमाळ व बुलडाणा असे प्रत्येकी एक अशा तीन प्रकल्पांमध्ये ९१ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा संचयित झाला आहे. अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारा अप्पर वर्धा प्रकल्प १०० टक्के भरला असून, १० सेंमीने तीन द्वारे उघडण्यात आली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वर्धा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा या मोठ्या प्रकल्पात ९१.७२ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे गेलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पात ९४.९८ टक्के पाणीसाठा आहे. लवकरच हा प्रकल्प शंभरी पार करेल, असा विश्वास जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत जलसंपदा विभागाने घेतलेल्या पाणीसाठ्याच्या नोंदीनुसार मोठे, मध्यम व लघु अशा पश्चिम विदर्भातील एकूण ५०२ प्रकल्पांमध्ये सरासरी ५९.७३ टक्के पाणीसाठा झालेला आहे. नऊ मोठ्या प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात आठ दिवसांत चांगली वाढ झाली असून, सरासरी ६८.२७ टक्के पाणीसाठा आहे. २४ मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ६४.७३ टक्के पाणीसाठा साचला आहे. ४६९ लघु प्रकल्पांतीलही पाणीसाठ्यात वाढत असून, ४५.७५ टक्के पाणीसाठा झाला आहे. ५०२ प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३१७४.११ दलघमी एवढा आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा १८९५.८७ आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ४२.५५ टक्के पाणीसाठा साचला आहे. अरुणावती प्रकल्पात फक्त १२.५४ टक्के पाणीसाठा आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात अद्यापही अपेक्षित पाणीसाठा झालेला नसून, फक्त १६.७२ टक्के पाणीसाठा आहे. वान प्रकल्पात मात्र चांगला पाणीसाठा झाला आहे, त्याची टक्केवारी ८६.१५ टक्के आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात फक्त ३०.१८ टक्के पाणीसाठा आहे. खडकपूर्णा प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे. प्रत्येक जिल्ह्यातील महत्त्वाच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा साचल्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचाही प्रश्न सुटला आहे. २४ मध्यम प्रकल्पांची स्थिती अमरावती जिल्ह्यातील शहानूर मध्यम प्रकल्पात ९२.७० टक्के पाणीसाठा आहे. उघडलेले प्रकल्पाचे दरवाजे सध्या बंद करण्यात आले आहेत. चंद्रभागा प्रकल्पात ९१.७६ टक्के पाणीसाठा आहे. पूर्णा प्रकल्पात ८९. २६ टक्के पाणीसाठा असून, पाच सेंमीने दोन गेट उघडण्यात आले आहे. सपन प्रकल्पात ९३.७६ टक्के पाणीसाठा असून पाच सेंमीने दोन द्वारे उघडण्यात आली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस प्रकल्पात ९४.२० टक्के पाणीसाठा आहे. सायखेडा १०० टक्के, गोकी ५२.५९ टक्के, वाघाडी ७२.५४ टक्के, बोरगांव ८०.०३ टक्के, नवरगांव १०० टक्के, अकोला जिल्ह्यातील निर्गुणा २४.५१ टक्के, मोेर्णा ३६.१६ टक्के, घुंगशी बॅरेज शुन्य टक्के, वाशिम जिल्ह्यातील अडाण प्रकल्पात १२.८७ टक्के, सोनल २३.५३ टक्के, एकबुर्जी ४५.७८ टक्के, बुलडाणा जिल्ह्यतील ज्ञानगंगा १०० टक्के, पलढग १०० टक्के, मस १०० टक्के, कोराडी शून्य टक्के, मन ५७.८६ टक्के, तोरणा ९३.२८ टक्के, उतावळी ५४.६७ टक्के पाणीसाठा साचला आहे.