अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : कार्यकारी अभियंत्यांअभावी तीन मध्यम व ४६ लघु प्रकल्पांवर पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामाचे नियोजन कोलमडले आहे. यात मागील सात महिन्यांपासून कार्यकारी अभियंत्यांचे, तर दीड वर्षापासून उपकार्यकारी अभियंत्याचे पद रिक्त आहे. शेड्यूल आॅफ गेटस्कडेही दुर्लक्ष आहे.अचलपूर येथे कार्यकारी अभियंता मध्यम व लघुपाटबंधारे विभागाचे कार्यालय आहे. पूर्वी याच कार्यालयाचे नाव शहानूर प्रकल्प विभाग, यानंतर चंद्रभागा प्रकल्प विभाग व पुढे पूर्णा प्रकल्प विभाग होते. आज मात्र नव्या नामकरणानुसार ते मध्यम व लघुपाटबंधारे विभाग असे असून या कार्यालयाकडे शहानूर, पूर्णा व चंद्रभागा या मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. हे तीनही मध्यम प्रकल्प पूर्ण झाले असून, या प्रकल्पांमध्ये पाणी अडविले जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात आपत्कालीन स्थिती या धरणांवर निर्माण होते. यात धरणाचे दरवाजे उघडले जातात. यावर नियंत्रण ठेवण्याकरिता नियमित कार्यकारी अभियंता असणे गरजेचे आहे.या तीन मध्यम प्रकल्पांतील दोन प्रकल्प अचलपूर तालुक्यात, तर एक प्रकल्प चांदूरबाजार तालुक्यात आहे. मध्यम प्रकल्पासोबतच अचलपूर येथील मध्यम व लघु पाटबंधारे विभागाकडे ४६ लघु प्रकल्प आहेत. या ४६ लघु प्रकल्पात यवतमाळ, नेर मधील एक, नांदगाव खंडेश्वरमधील एक, अमरावतीमधील चार, तिवसा येथील पाच, अचलपूर तीन, अंजनगाव दोन, चांदूररेल्वे चार, मोर्शी दोन, वरूड नऊ, चांदूरबाजार एक, तर धारणीमधील चौदा लघु प्रकल्पांचा समावेश आहे. या लघु प्रकल्पांमधील अनेक लघू प्रकल्प संवेदनशील आहेत.यात मागील सात महिन्यांपासून रिक्त असलेल्या कार्यकारी अभियंत्यांचा अतिरिक्त प्रभार अमरावती पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे आहे. मुळात अमरावती पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडेच मोठमोठी धरणे आहेत. कामाचा व्याप अधिक आहे. अमरावतीवरून ते अचलपूर मध्यम व लघु प्रकल्प विभागाला न्याय देऊ शकत नाहीत. तसेच याच विभागातील उपकार्यकारी अभियंत्यांचे पद दीड वर्षांपासून रिक्त आहे. उपविभागीय अभियंत्याचे पदही रिक्त आहे.कुठल्याही धरणाचे दरवाजे उघडताना किंवा धरणातून पाणी सोडताना पावसाळ्यापूर्वीच जूनपासून पुढील प्रत्येक महिन्याला किती पाणी सोडायचे याकरिता ‘सेड्यूल आॅफ गेटस्’ मंजूर करून घेतले जाते. कार्यकारी अभियंता हे ‘सेड्यूल आॅफ गेटस्’ मुख्य अभियंत्यांकडून मंजूर करून घेत असतात. मध्यम व लघु प्रकल्प विभाग अचलपूर अंतर्गत असलेल्या शहानूर, चंद्रभागा व पूर्णा धरणावर हे ‘सेड्यूल आॅफ गेटस्’ अजूनपर्यंतही मुख्य अभियंत्याकडून मान्य करून घेण्यात आलेली नाही.
तीन मध्यम, ४६ लघु प्रकल्प वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 10:40 PM
कार्यकारी अभियंत्यांअभावी तीन मध्यम व ४६ लघु प्रकल्पांवर पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामाचे नियोजन कोलमडले आहे. यात मागील सात महिन्यांपासून कार्यकारी अभियंत्यांचे, तर दीड वर्षापासून उपकार्यकारी अभियंत्याचे पद रिक्त आहे. शेड्यूल आॅफ गेटस्कडेही दुर्लक्ष आहे.
ठळक मुद्देउपकार्यकारी अभियंत्याचे पदही रिक्त : ‘शेड्यूल आॅफ गेट्स’कडेही दुर्लक्ष