नांदगाव खंडेश्वर : कर्तव्यावरील वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी सातरगाव येथील अरुण सोपान काकडे यास नांदगावच्या न्यायालयाने तीन महिने कारावास व ५०० रुपये दंड ठोठावला. नांदगाव बसस्थानकावर सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेले वाहतूक पोलीस रवी पाखरे यांना आरोपी अरुण काकडे याने कॉलर पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत रवी पाखरे यांचा गणवेश फाटला. पोलीस कर्मचारी सईद शहा हे भांडण सोडविण्यास गेले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. याबाबतची फिर्याद पोलिसांत नोंदविण्यात आली होती. तपास अधिकारी मोतीराम पवार यांनी या प्रकरणाचा तपास करुन दोषारोपपत्र नांदगावच्या न्यायालयात दाखल केले. सरकारी पक्षाच्यावतीने सरकारी वकील मंगेश मानकर यांनी आठ साक्षीदार तपासले. आरोपींचा दोष सिध्द झाल्याने नांदगाव न्यायालयाचे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी भा.की .गावंडे यांच्या न्यायालयाने आरोपीला तीन महिन्यांचा साधा कारावास व ५०० रुपये दंड ठोठावला. दंडाच्या रकमेतून फिर्यादीला २०० रूपये देण्याचा आदेश देण्यात आला. (प्रतिनिधी)
पोलिसाला मारहाणप्रकरणी तीन महिन्यांचा कारावास
By admin | Published: March 05, 2016 12:24 AM