परतवाडा : दीड वर्षांपासून बंद असलेली फिनले मिल सुरू करण्याकरिता गिरणी कामगार संघाच्यावतीने अचलपूरमध्ये शोले स्टाईल आंदोलन सुरू करण्यात आले. यात बॉयलरच्या ३०० फूट उंच चिमणीवर गिरणी कामगार संघाचे तीन पदाधिकारी २३ ऑगस्टला सकाळी साडेसहाच्या सुमारास चढले, जवळपास पाचशे कामगार मिलच्या गेटजवळ ठिय्या आंदोलन देत आहेत.
अध्यक्ष अभय माथने, उपाध्यक्ष राजेश ठाकूर व धर्मा राऊत हे सकाळी चिमणीवर चढले. अन्य दोघेही त्या चिमणीवर चढले. पण, चिमणी हलायला लागल्यामुळे ते दोघे खाली उतरले. पहाटे चिमणीवर चढलेले तीनही नेते मात्र सायंकाळपर्यंतही खाली उतरले नव्हते. ही माहिती मिळताच अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी पी.जे. अब्दागिरे, परतवाडाचे ठाणेदार सदानंद मानकर तसेच अचलपूर व परतवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फायर ब्रिगेडसह रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली. अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव व उपविभागीय अधिकारीदेखील फिनले मिलमध्ये पोहोचले. भाजपचे गजानन कोल्हे व अन्य पदाधिकारीसुद्धा घटनास्थळी दाखल झाले.
----------------
कामगार मागण्यांवर ठाम
बंद असलेली फिनले मिल सुरू करा. कामगारांना कामावर येऊ द्या. कामगारांच्या हातांना काम द्या, या मागणीसह वेतन आणि वेतनातील फरक मिळावा, याकरिता गिरणी कामगार संघाने हे आक्रमक पाऊल उचलले. धनंजय लव्हाळे, विवेक महल्ले, सचिन जिचकार, दिनेश उघडे, नरेंद्र बोरकर, मनीष लाडोळे, राजेश गौर, पिंट्या जायले, सुधीर भोगे या कामगारांनी दिला होता. वृत्त लिहिस्तोवर जनरल मॅनेजर अमित सिंग यांच्याशी मिल प्रशासनाच्यावतीने चर्चा सुरू होती.
-------------------