अमरावती : टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना तीन संधींमध्ये ही परीक्षा उत्तीर्ण होण्याची मुभा शासनाने दिलेली आहे. या तीन संधींची गणना ३० जून २०१६ पासून लगतच्या तीन टीईटीसाठी आहे. जून २०१७ मध्ये पहिली संधी झाली आहे. आता दोन संधी उरल्या आहेत. तीन संधींमध्ये टीईटी उत्तीर्ण न झाल्यास शिक्षकाच्या नोकरीवर पाणी सोडावे लागणार आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या वर्गांसाठी प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीच्या वेळी किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) धारण करणाºया उमेदवारासच नियुक्त करण्यात यावे, असा शासननिर्णय १३ फेब्रुवारी २०१३ रोजी झालेला आहे. २४ नोव्हेंबर २०१७ च्या परिपत्रकानुसार, किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण असणाºया उमेदवाराची नियुक्ती सरळ सेवेने १३ फेब्रुवारी २०१३ नंतर करण्यात आली असल्यास व तो टीईटी उत्तीर्ण नसल्यास प्रथम तीन संधीत टीईटी उत्तीर्ण होणे शासनाने अनिवार्य केलेले आहे. या तीन संधींची गणना केव्हापासून करण्यात यावी, याबाबत संभ्रम होता. त्यामुळे शासनाने २४ नोेव्हेंबर २०१७ रोजी परिपत्रक काढले आहे. तीन संधीची गणना ३० जून २०१६ पासून पुढील लगतच्या तीन ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ अशी असेल. ३० जून २०१६ नंतर रिक्त पदांवर होणारी नवीन नियुक्ती ही टीईटीधारकाचीच राहील, असेही या परिपत्रकात स्पष्टपणे नमूद केले आहे.
- नवीन नियुक्ती ही टीईटीधारकाचीच राहणार आहे. पात्रता धारण करण्यासाठी तीन संधी दिल्या जाणार आहेत. त्यात संबंधितांना परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.- सी.आर. राठोेड, शिक्षण उपसंचालक, अमरावती