अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांचा मंगळवारी एकाच वेळी मृत्यू झाला. त्यामुळे तिन्ही रुग्णांच्या नातेवाईकांचा रडण्याचा आकांत पाहून अनेकांच्या काळजाला यावेळी पाझर फुटला होता. या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये बालक युवने (५०, रा. वावरुडी पो.स्टे., बेनोडा) आणि आशा कांबळे (४५, रा. नांदगावपेठ) या दोघांना सर्पदंश झाला होता. तर अनिल इंगळे (५०, रा. ब्राम्हणवाडा गोविंदपूर, ता. अमरावती) यांचा हृदयविकाराने निधन झाले.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये दरवर्षी वाढ होते. सर्पदंशामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. असाच काहीसा प्रसंग मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू विभागात घडला. दोन वेगवेगळ्या सर्पदंशाच्या घटनांमध्ये कोणी आपली आई तर कोणी आपले वडील गमावले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार बालक युवने यांना सर्पदंश झाल्याने २५ जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांची गंभीर प्रकृती लक्षात घेता त्यांना तातडीने आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते.
आठ दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते; परंतु, अखेर त्यांची ही झुंज कायमची संपली. तर आशा कांबळे यांना १ ऑगस्टला सकाळी घरातच सर्पदंश झाल्याने त्यांना तातडीने इर्विनमध्ये दाखल केले होते. त्याच्यावरही आयसीयूमध्ये उपचार सुरू होते; परंतु, त्यांचीही दुपारी प्राणज्योत मावळली. तर हृदयविकाराचा झटका आलेल्या अनिल इंगळे यांचाही आयसीयूमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तीनही रुग्णांची शेकडोच्या संख्येत नातेवाईक यावेळी रुग्णालयात पोहाेचले होते.
सहा महिन्यांत ५६९ नागरिकांना सर्पदंश
जिल्ह्यात जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ५६९ नागरिकांना सर्पदंश झाला. यातील ३४४ रुग्णांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.