परतवाडा : अचलपूर तालुक्यातील वडनेर भुजंग, कविठा बु. व हनवतखेडा ग्रामपंचायतींच्या रिक्त राहिलेल्या सरपंचपदावर शुक्रवारी अविरोध निवड झाली, तर वज्झर येथे सदस्य निवडीवर बहिष्कार असल्याने तेथे प्रशासक नेमण्यात आले आहेत.
तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. तथापि, वडनेर भुजंग, कविठा बु. व हनवतखेडा येथे सरपंचपदासाठी राखीव प्रवर्गाचा उमेदवार न मिळाल्याने उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी सरपंच आरक्षणात बदल केला. यानंतर शुक्रवारी घेण्यात आलेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत वडनेर भुजंग येथे योगिता सुबोध विधळे, कविठा बु. येथे बाबूराव साकोम व हनवतखेडा येथे विजय ढेपे यांची अविरोध निवड झाल्याची माहिती नायब तहसीलदार (निवडणूक) अक्षय मांडवे यांनी दिली.
--------------
वज्झर येथे बहिष्कार
वज्झर ग्रामपंचायतीवर सातपैकी एका जागेवर सदस्य अविरोध निवडून आला. अनुसूचित जमातीचे प्राबल्य असलेल्या ग्रामपंचायतीला १५ वर्षांपासून इतर मागास वर्गासाठी सरपंचपदाचे आरक्षण निघत आहे. त्यामुळे राखीव सहा जागांवर उमेदवार उभे झाले नाहीत. सरपंच व उपसरपंच या दोन्ही पदांसाठी कोरम पूर्ण नसल्याने निवडणूक घेता आली नाही. त्यामुळे येथे सदस्यपदासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम पुन्हा लावला जाणार आहे.