आज गणेश चतुर्थी, बहिरमचा अष्टभुज, वायगावचा जागृत, बोराळ्याचा स्वयंभू, पूर्णानगरचा सिद्धेश्वर वैशिष्ट्यपूर्ण
अनिल कडू
परतवाडा : भक्तांची इच्छापूर्ती करणारी गणेशाची तीन शक्तिपीठे जिल्ह्यात आहेत. यात बहिरमचा अष्टभुज महागणपती,
वायगावचा उजव्या सोंडेचा गणपती आणि बोराळ्याचा स्वयंभू गणपती यांचा समावेश आहे, तर पूर्णानगरचा सिद्धेश्वर गणपती वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे.
श्रीक्षेत्र बहिरम येथे सातपुडा पर्वताच्या शिखरावर बहिरमबाबाच्या साक्षीने अष्टभुजाधारी महागणपती विराजमान आहेत. अखंड पाषाणावर कोरलेल्या या मूर्तीची उंची सात फूट आहे. महान तपस्वी राज योगी भावसिंग यांच्या कालखंडातील ती आहे. या मूर्तीच्या आजूबाजूला रिद्धी-सिद्धी आहेत. नितांत सुंदर, कोरीव, प्राचीन तथा वैभवशाली ही मूर्ती शेंदूरवर्णी असून भक्तांसह पर्यटकांचे आकर्षण ठरली आहे.
वायगावचा गणपती
वायगाव येथे उजव्या सोंडेची गणेशमूर्ती विराजमान आहे. सोळाव्या शतकात उत्खननादरम्यान गावाशेजारी शेतजमिनीत ती आढळून आली. वायगाव येथील सीतारामजी पाटील इंगोले यांच्या वाड्यातील दिवाणखान्यात ही मूर्ती ठेवली गेली. यालाच पुढे मंदिराचे स्वरूप प्राप्त झाले. महाभारतकालीन ही मूर्ती शुभ्र संगमरवरावर कोरली गेली आहे. महाराष्ट्रात आढळून येणाऱ्या उजव्या सोंडेच्या अतिप्राचीन मूर्तींपैकी ती एक आहे. अमरावती-परतवाडा मार्गावर वलगावपासून काही अंतरावरील वायगाव येथील गणेश मंदिरात ती विराजमान आहे.
बोराळ्याचा स्वयंभू
अंजनगाव शहरालगत बोराळ्याचा स्वयंभू गणेश शेकडो वर्षे जुना आहे. दीडशे वर्षापूर्वी नित्यानंद महाराजांना या गणपतीने दृष्टांत दिला. दृष्टांतानुरूप ही गणपतीची मूर्ती उत्खननात आढळून आली. आणि त्याच ठिकाणी या मूर्तीची स्थापना केली गेली. याच गणेशमूर्तीसमोर नित्यानंद
महाराजांची समाधी आहे. हा स्वयंभू गणपती शेंदूरवर्णी आहे.
पूर्णानगरचा सिद्धेश्वर
अमरावती-परतवाडा मार्गावर पूर्णानगर येथे पुरातन सिद्धेश्वराचे मंदिर आहे. सिद्धेश्वर नामक ही गणेशमूर्ती चतुर्मुखी आहे. चतुर्मुखी गणेश मूर्ती असलेले हे विदर्भातील एकमेव मंदिर आहे. शेंदूरवर्णी असलेली ही गणेशमूर्ती सुंदर, कोरीव, सुबक, प्राचीन तथा वैभवशाली आहे.
जागृत शक्तिपीठे
जिल्ह्यातील ही गणेशाची शक्तिपीठे जागृत आहेत. भक्तांच्या मान्यतेनुसार मनोभावे पूजाअर्चनेला पावणारे गणपती या ठिकाणी विराजमान आहेत. गणेशोत्सवादरम्यान व प्रत्येक संकष्टी चतुर्थीला या ठिकाणी भक्तांची वर्दळ राहते.