‘जिल्हा परिषद लाईव्ह एज्युकेशन’
अनिल कडू
परतवाडा : कोरोनाकाळातही विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहाशी जुळवून ठेवण्याचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अचलपूर पंचायत समितीच्या तीन शिक्षिकांना औरंगाबाद येथे सन्मानित केले गेले.
‘जिल्हा परिषद लाईव्ह एज्युकेशन’च्या माध्यमातून या शिक्षिकांचे कार्य उल्लेखनिय ठरले आहे.
अचलपूर तालुक्यातील बोरगाव तळणी येथील जिल्हा परिषद शाळेच्या अलका चोपडे, जवर्डी येथील जिल्हा परिषद शाळेच्या श्वेता घेवारे तसेच काळवीट येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षक अनुपमा कोहळे यांचा राज्यव्यापी उपक्रमात औरंगाबाद येथे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते ४ फेब्रुवारीला गौरव करण्यात आला.
याप्रसंगी औरंगाबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले, विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल, गटशिक्षणाधिकाºयांसह राज्यातील तब्बल चारशेहून अधिक शिक्षक उपस्थित होते.
शिक्षिकांकडून बनविले गेलेले अॅप परिणामकारक ठरले आहेत. या अॅपचा राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचा विषयनिहाय संपूर्ण अभ्यासक्रम या अॅपमध्ये आहे. सर्वच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा म्हणून या ऑनलाईन अॅपचे ऑफलाईन मध्ये रूपांतर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
तिन्ही शिक्षिकांचे अचलपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयंत बाबरे, गटशिक्षणाधिकारी वसंत मनवरकर, पंचायत समिती सभापती कविता बोरेकर, अमोल बोरेकर, सेवानिवृत्त गटशिक्षाधिकारी रूपराव सावरकर, उपशिक्षणाधिकारी गंगाधर मोहने, केंद्रप्रमुख राजीव खोजरे यांनी कौतुक केले.