अखेर मुहूर्त मिळाला : पाणी पेटले, दांडी मारणाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णयलोकमत न्यूज नेटवर्कचांदूररेल्वे : तब्बल तीन वर्षांनंतर झालेल्या चांदूररेल्वे पंचायत समितीची आमसभा तालुक्यातील अनेक गावांतील भीषण पाणी टंचाईसह प्रलंबित रस्ते बांधकाम, दलित वस्ती, घरकूल व मनरेगातील प्रलंबित कामाच्या मुद्यावर चांगलीच गाजली. यावेळी आमसभेला दांडी मारणारे अधिकारी, ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचे आदेश आ. वीरेंद्र जगताप यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले. आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार वीरेंद्र जगताप, तर प्रमुख अतिथी म्हणून अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, सभापती किशोर झाडे, चांदूररेल्वेचे तहसीलदार बी.ए.राजगडकर, गटविकास अधिकारी अमोल आंदेलवाड, सहायक गटविकास अधिकारी सोनाली माडकर, पंचायत समिती सदस्य नीलिमा होले, भीमराव करवाडे, सतीश देशमुख, जिल्हा परिषद सदस्य रंजना गवई, राधिका घुईखेडकर, नगराध्यक्ष शिट्टू सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रविण घुईखेडकर उपस्थित होते. सभेची सुरूवात राष्टसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. मागील ८ वर्षांपासून घुईखेड पुनर्वसन येथील भीषण पाणी टंचाईच्या प्रश्नासह इतर अनेक गावांतील भीषण प्रश्नावर चर्चा झाली. यावर तहसीलदारांना त्वरित पाणीटंचाई आराखड्यातून अंमलबजावणी करण्याचे आदेश आ.जगताप यांनी दिले. सावंगी मग्रापूर येथील निकृष्ट पाणी पुरवठ्याची कामे तसेच टेंभुर्णीत कार्यान्वित निकृष्ट पाणीपुरवठा पाईप लाईनचा मुद्दा उचलून धरला. त्यावर उपविभागीय अभियंता सावरकर यांनी तातडीने अहवाल देण्याचे आदेश दिले. शहरातील पाणी शुध्दीकरण केंद्रावरील टाकी नियमित स्वच्छतेचा प्रश्न मांडला. त्यावर मुख्याधिकारी पाटील यांनी महिन्यातून एकदा टाकीची स्वच्छता करण्याचे आश्वासन दिले. चांदूर शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविणे, तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे सा.बां.विभाग व जि.प.उपबांधकाम विभागाने त्वरित पूर्ण करण्याचे आदेश एसडीई नांदूरकर व साकुरे यांना देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विवेक राऊत, प्रास्ताविक बीडीओ अमोल आंदेलवाड यांनी केले. या सभेला सर्व शासकिय विभागाचे अधिकारी व चांदूर तालुक्यातील सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, मुख्याध्यापक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तीन वर्षांनंतर आमसभा
By admin | Published: May 21, 2017 12:10 AM