अमरावती : गवळीपुरा येथे राहणाऱ्या १५ वर्षीय मुलाने एका अपहरणकर्त्याच्या हाताला चावा घेऊन चौघांच्या तावडीतून सुटका करून घेतली. ही थरारक घटना १७ मे रोजी दुपारी चारच्या सुमारास उघड झाली. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी अनोळखी चार जणांविरुद्ध कलम ३६३, ३२३, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. १८ मे रोजी रात्री १ वाजता हा गुन्हा नोंदविण्यात आला. अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटून गवळीपुरा येथे पोहोचल्यानंतर त्याने पालकांसह नागपुरी गेट पोलीस ठाणे गाठले.
तक्रारीनुसार गवळीपुरा येथील १५ वर्षीय मुलगा १७ मे रोजी दुपारी घरालगतच्या अकॅडमिक शाळेच्या मैदानात खेळत होता. त्यावेळी त्या परिसरात कुणीही नव्हते. ती संधी साधत चेहऱ्याला दुपट्टा बांधलेले चारजण तेथे आले. पैकी एकाने त्या मुलाच्या मानेच्या मागून हात घालून त्याला कशाचा तरी हुंगा दिला. आरोपींनी त्याचे अपहरण करून त्याला एका चारचाकी वाहनात बसविले. बेशुद्धावस्थेत असलेल्या त्या मुलाच्या चेहऱ्यावर पाणी मारण्यात आले, त्यामुळे तो शुद्धीवर आला. चारपैकी दोघांनी त्याला थापडबुक्क्यांनी मारहाण केली, तर दोन आरोपी चारचाकी वाहनात बसले होते. जवळ असलेल्या दोन आरोपींपैकी एकाच्या हाताला चावा घेऊन त्याने तेथून पळ काढला. काही किलोमीटर धावत जाऊन त्याने कुऱ्हा गाव गाठले. तेथे एका ऑटोरिक्षाचालकाला मदत मागत त्याने आपले अपहरण झाल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. लागलीच त्याचे पालक कुऱ्हा येथे गेले. त्याला सुखरूप अमरावतीत आणण्यात आले.
शक्यतांची पडताळणी
ते चार इसम नेमके कसे होते, त्यांचा पेहराव काय होता, वाहन कुठले होते, कुठल्या गावाशेजारी सोडण्यात आले, अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटून नेमका कोणत्या दिशेने पळ काढला, या दिशेने नागपुरी गेट पोलिसांनी तपास चालविला आहे. मात्र, त्या मुलाला फारसे वर्णन ठाऊक नसल्याने किंवा तो सांगत नसल्याने पोलिसांना मर्यादा आल्या आहेत. पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. त्या मुलाचे वडील हातमजुरी करीत असल्याने अपहरकर्त्यांचा नेमका डाव काय असावा, या दिशेनेदेखील तपास सुरू आहे.
अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटून आपण कुऱ्हा गाव गाठल्याचे तो म्हणतो. त्या मुलाची मावशी कुऱ्हा येथे राहते. त्यामुळे सर्व शक्यता पडताळून पाहत आहोत. तांत्रिक तपास सुरू आहे.
पुंडलिक मेश्राम, ठाणेदार, नागपुरी गेट