सर्वसाधारण सभा : विविध विषयांवरही चर्चाअमरावती : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर केलेल्या नांदगाव तालुक्यातील रस्त्याची कामे मजुरांमार्फत न करता जेसीबीने केल्या प्रकरणी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ माजला.जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांना अनुसरून डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या सभेत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंर्तगत मंजूर केलेल्या नांदगाव तालुक्यातील अडगाव ते पारडी,एरंडगाव ते मालखेड व अन्य काही रस्त्याची कामे मजुरामार्फत न करता जेसीबीने केल्या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, असा मुद्दा सभागृहात जिल्हा परीषद सदस्य रवींद्र मुंदे, अभिजीत ढेपे, निशिकांत जाधव, आदी सदस्यांनी रेटून धरली. या विषयावर बराच वेळ वादळी चर्चा रंगली. अखेर नांदगावच्या गटविकास अधिकार्यांनी त्यांची बाजू मांडली. मात्र, यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे याविषयावर अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी मध्यस्थी करून या प्रश्नावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश सीईओंना दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहात दिले. त्यामुळे हा मुद्दा येथे निवळला. यासोबतच नांदगाव तालुक्यात ६९ गावामध्ये मंजूर करण्यात आलेल्या सिंचन विहिरी लाभार्थ्याना कामे सुरू केल्यानंतरही निधीचा हप्ता देण्यात आला नाही. या विषयावरही जिल्हा परिषदेच्या आमसभेत चर्चा करण्यात आली.
आमसभेत रोहयोच्या मुद्यावर गदारोळ
By admin | Published: May 30, 2014 11:21 PM