सुनील देशपांडे अचलपूरविदर्भात ३ ते ५ मे दरम्यान तुरळक पाऊस पडण्याची स्थिती अनुकूल असून सोबतच उष्णतेची लाटसुध्दा कायम राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांच्या अंदाजानुसार उत्तर-पश्चिम राजस्थान लगतचा पंजाब आणि भोवताल दीड किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे आहेत. मराठवाडा ते कोमोरीन (केरळ) च्या दीड किमी उंचीवर खंडित वारे आहेत. पूर्व उत्तरप्रदेश, झारखंड आणि गांगेय पश्चिम बंगालवर कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. आसाम आणि मेघालयावर ३ किमी.उंचीवर चक्राकार वारे आहेत. या सर्व परिस्थितीमुळे ३ ते ५ मेपर्यंत विदर्भात हलका पाऊस पडण्याची स्थिती अनुकूल आहे. त्यातच पूर्व विदर्भात पाऊसाची अधिक शक्यता असल्याचे मत बंड यांनी वर्तविले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत कमाल तापमान २ ते ३ डिग्री सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. ८ मे नंतर मध्य भारतात पुन्हा पावसाची शक्यता आहे. काही दिवसांत कमाल तापमान ४३ ते ४५ डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. यंदाचे वर्ष सर्वाधिक उष्ण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील एखाद्या ठिकाणचे तापमान काही वेळाकरिता ५० डिग्रीपर्यंतसुध्दा जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
गुरुवारपर्यंत तुरळक पाऊस
By admin | Published: May 04, 2016 12:18 AM