अमरावती : शहरात रविवारी दुपारपर्यंत सूर्यप्रकाश असताना साडेचारच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. तासभर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. यादरम्यान बोराएवढी गार पाच मिनिटांपर्यंत पडली. मात्र, कुठेही नुकसान झालेली नाही. रात्रीच्या वादळात शेगाव ते रहाटगाव मार्गावर एक झाड विजेच्या तारांवर पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता.
अचानक आलेला पाऊस व गारपिटीमुळे दुचाकीस्वारांनी कडेला आश्रय घेतला. चिखलदरा येथेही दुपारी पावसासह गारपीट झाल्याचे वृत्त आहे. तीन दिवस झालेल्या गारपिटीमुळे पाच तालुक्यातील २१०० हेक्टरमधील गहू, हरभरा, कांदा, टरबूज व संत्रा पिकाचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आहे.