अमरावती : दरवर्षी बुद्धपौर्णिमेला होणारी व्याघ्र गणना यंदा कोरोना संसर्गामुळे रद्द करण्यात आली. त्यामुळे २६ मे रोजी अभयारण्ये, राखीव वनांत व्याघ्र गणनेला प्रवेश करता येणार नाही. सलग दुसऱ्या वर्षीही व्याघ्र गणना होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढत असून, रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्येचा आलेख वाढत आहे. त्यामुळे वन्यजीव विभागाने यंदा २६ मे रोजी बुद्धपौर्णिमेला होणारी व्याघ्र गणना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटत असला तरी मनुष्यापासून वन्यजीवांना धोका होण्याची दाट शक्यता राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने एका पत्राद्धारे व्यक्त केली आहे. त्यामुळे वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य नितीन काकोडकर यांनी बुद्धपैर्णिमेला होणारी व्याघ्र गणना रद्द झाल्याचे कळविले आहे. निसर्गप्रेमी, वन्यजीवप्रेमी, पर्यावरण अभ्यासकांना व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यात प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट केले आहे. पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव- नागझिरा, मेळघाट, बोर व सह्याद्री अभयारण्याच्या प्रमुखांना व्याघ्र गणना रद्द झाल्याबाबत वरिष्ठांनी कळविले आहे.
-----------------
कोरोना संसर्गामुळे यंदा २६ मे रोजी बुद्धपौर्णिमेला होणारी व्याघ्र गणना रद्द आहे. त्याअनुषंगाने वरिष्ठांचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे निसर्गप्रेमी, वन्यजीवप्रेमी, पर्यावरण अभ्यासकांना व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यात प्रवेश करता येणार नाही.
- जयोती बॅनर्जी, क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प