नरेंद्र जावरे/परतवाडा (अमरावती) : बारा दिवस अमरावती जिल्ह्यात प्रचंड दहशत पसरविणाºया नरभक्षक वाघाने मध्यप्रदेशच्या ताप्ती नदीचे जंगल पार करून सातपुडा टायगर रिझर्व्हच्या दिशेने कूच केली आहे. आतापर्यंत त्याने येथील जंगलात पाळीव चार गुरांची शिकार केली. वनविभागाने त्याला नजरकैदेत ठेवले असून, उत्तर-पश्चिम दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे त्याची परतण्याची शक्यता सध्या मावळली आहे. जिल्ह्यात १८ ते ३० आॅक्टोबरपर्यंत चंद्रपूरच्या अडीच वर्षीय युवा वाघाने अक्षरश: धुमाकूळ घातला. दोन माणसांसह गुरांचा फडशा त्याने पाडला. उत्तर दिशेने निघालेला वाघ मोर्शी परिसरातील जंगलातून मध्यप्रदेशात शिरला. १० दिवसांपासून त्याची वाटचाल उत्तर-पश्चिम दिशेने सुरू आहे. या दहा दिवसांत त्याने जंगलाला लागून असलेली आदिवासी खेडी ओलांडत पुढील प्रवास सुरू ठेवला. अनेकांनी त्याला उघड्या डोळ्यांनी पाहिले. मात्र, या परिसरात एकाही माणसावर त्याने हल्ला केला नसल्याचे बैतुल उत्तर झोनचे उपवनसंरक्षक अशोक कुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दिवाळीच्या दिवशी बैतुल टाऊन केले पारमोर्शी, सालबर्डी, दाबका, जामगाव खडका, जामठी पांढरघाटी, उमरी, धारूड होत वाघोबाने पलासपानी जंगलात तीन दिवस बस्तान मांडले. त्यानंतर आठनेर परिक्षेत्रात बनबेहरा जंगलातून ताप्तीचे जंगल पार केले. दिवाळीच्या दिवशी बैतूल टाऊन जंगलातून उत्तर पश्चिम दिशा घेत त्याने पुढील प्रवास सुरू ठेवला आहे. सातपुडा टायगर रिझर्व्हमध्ये तो बस्तान मांडणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. घनदाट अरण्यात चौसिंगा, हरण, ससा, सांबर असे मोठ्या प्रमाणात तृणभक्षी आहेत. परिसरातील गुरांवरही तो हल्ला करून आपले पोट भरू शकतो. मुबलक प्रमाणात पाणी, आवश्यक असलेले जंगल या सर्व सोई असल्याने कायमचे बस्तान मांडण्याचे शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. ‘लोकमत’ने भाकीत पूर्वीच वर्तविले होते, हे विशेष.
प्रत्येकी सहा तासांचे लोकेशन मध्यप्रदेशच्या जंगलात आलेला हा पाहुणा दिवसभर काय करतोे, याचे प्रत्येकी सहा-सहा तासांचे लोकेशन वनविभागाच्यावतीने घेतले जात आहे. त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. मध्यप्रदेशच्या जंगलात गेल्या दहा दिवसांपासून वाघामागोमाग वनकर्मचाºयांचा प्रवास सुरू आहे. त्याला कुठेही त्रास होऊ नये, याची दक्षता मध्य प्रदेश वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने घेतली जात आहे.
वाघाने आतापर्यंत चार गुरांची शिकार केली. तो घनदाट अरण्यात रमला आहे. उत्तर पश्चिम दिशेने त्याचा प्रवास अजूनही कायम आहे. त्यामुळे त्याच्या परतण्याची शक्यता फार कमी आहे. आवश्यक पोषक वातावरण त्याला येथे मिळाले आहे.- अशोक कुमार, उपवनसंरक्षक बैतुल उत्तर (मध्यप्रदेश)