गणेश वासनिक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : देश, विदेशात कोरोनाने कहर केल्यामुळे संपूर्ण मानवजात हैराण झाली आहे. मात्र, कोरोना संसर्ग हा वन्यजीवांना होऊ शकताे, असे संकेत राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने दिले आहेत. त्यामुळे व्याघ्र प्रकल्प अथवा राखीव संरक्षित वनातील वाघांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाघांच्या हालचाली मंदावताच त्याचे रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीला पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
मार्च २०२० पासून कोरोनाचे आगमन झाले आणि त्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाले. सप्टेंबरमध्ये पर्यटक आणि वाघांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने एनटीसीएने गाईडलाईन जारी केले होते. ऑक्टाेबर ते डिसेंबर २०२० या दरम्यान व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. परंतु, कोरोनाचा नवीन वर्षात जानेवारीमध्ये पुन्हा उद्रेक झाला. त्यानंतर आजतागायत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर व्याघ्र प्रकल्पांना टाळे लावण्यात आले आहे. ऑगस्टनंतर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुले होतील, अशी माहिती आहे. मात्र, वाघांची भूमी असलेल्या विदर्भात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे क्षेत्रीय वनकर्मचारी, अधिकारी यांना वाघांच्या हालचाली टिपण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ट्रॅप कॅमेऱ्यातून वाघांचा अधिवास, त्याच्या हालचाली, भक्षक आदींबाबतची अचूक माहिती ठेवण्याच्या सूचना एनटीसीएच्या आहेत. राज्यात पेंच, ताडोबा- अंधारी, नवेगाव-नागझिरा, मेळघाट व बोर अभयारण्य हे पाच व्याघ्र प्रकल्प विदर्भात, तर सह्याद्री पश्चिम महाराष्ट्रात आहे.
भटकी श्वानांवर पाळत ठेवा
व्याघ्र प्रकल्पानजीकच्या गावांमध्ये असलेली भटकी श्वानांनी व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करू नये, याची खबरदारी घेण्याचे वरिष्ठांनी कळविले आहे. अनावधानाने ही भटकी श्वान व्याघ्र प्रकल्पात शिरली आणि वाघाने त्याची शिकार केल्यास त्याच्यापासून वाघांना विषाणू अथवा जिवाणूचा धोका बळावण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्प अथवा अभयारण्यात भटकी श्वान जाऊ नये, याबाबत काळजी घेण्याचे सुचविले आहे.
वन्यजीवांची खबरदारी घेणे गरजेचे
राज्यात वन्यजीवांना कोरोनाची लागण झाली, असे आतापर्यंत एकही उदाहरण पुढे आले नाही. मात्र, ज्याप्रकारे कोरोनाने मनुष्यास वेठीस धरले, ते बघता वन्यजीवांची खबरदारी घेणे गरजेचे आहे. व्याघ्र प्रकल्प अथवा राखीव वनांत कर्मचारी, अधिकारी संक्रमित असल्यास त्याने वन्यजीवांच्या परिसरात राहू नये. वाघात अशी काही लक्षणे दिसून आल्यास विषाणूच नव्हे तर जिवाणूची तपासणी करता येईल. वाघांचे रक्ताचे नमुने घेऊन उपचार करता येते, असे जिल्हा पशु वैद्यकीय अधिकारी विजय राहाटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
एनटीसीएचे पत्र प्राप्त झाले असून, वाघांच्या एकूणच हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश आहेत. क्षेत्रीय वनाधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रसंगी एखादा वाघ दोन ते तीन दिवसांपासून एकाच जागेवर बसून आढळल्यास त्याचे रक्ताचे नमुने पशु वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणीसाठी पाठविण्याचे कळविण्यात आले आहे.
- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, पश्चिम विभाग (मुंबई)