अनिल कडू
अमरावती : मध्यप्रदेशातील सातपुडा व्याघ्र अभयारण्यातील चारवर्षीय वाघीणमेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत आकोट वन्यजीव विभागातील अंबाबरवा अभयारण्यात ३१ जानेवारीला आढळून आली आहे.
वाघिणीच्या गळ्यात पट्टारुपी कॉलर आयडी आहे. या कॉलर आयडीचा सॅटेलाइटशी असलेला संपर्क तुटला आहे. मागील काही दिवसांपासून मध्यप्रदेशातील वन्यजीव प्रशासन या वाघिणीच्या शोधात होते. कॉलर आयडीचा सॅटेलाइटशी संपर्क तुटल्यामुळे या वाघिणीची माहिती सातपुडा व्याघ्र अभयारण्यातील वन्यजीव प्रशासनाला मिळत नव्हती. तिचा पत्ता लागत नव्हता. दरम्यान, ३१ जानेवारीला मेळघाट व्याघ्र अभयारण्यांतर्गत अंबाबरवा अभयारण्यातील, सोनाळा वनपरिक्षेत्रातील, अन्यार बीटमधील कॅमेरा ट्रॅपमध्ये ती आढळून आली. कॅमेरा ट्रॅपमधील छायाचित्रांवरुन ही वाघीण आपली नसल्याचा मेळघाट व्याघ्र अभयारण्यातील वन्यजीव प्रशासनाच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी मध्यप्रदेशातील सातपुडा व्याघ्र अभयारण्यास याची माहिती दिली. सातपुडा व्याघ्र अभयारण्यातील वन्यजीव प्रशासनाला तिची ओळख पटली. कॉलर आयडी लागलेली वाघीण सातपुडा व्याघ्र अभयारण्यातून मेळघाटातील अंबाबरवात पोहोचल्याची त्यांना खात्री पटली.
चारवर्षीय वाघीण २५० किलोमीटरचे अंतर पार करून सातपुडा व्याघ्र अभयारण्यातून अंबाबरवा व्याघ्र अभयारण्यात पोहोचली आहे. २५० किलोमीटरचे हे अंतर तिने ४५ दिवसांमध्ये कापले आहे. यादरम्यान तिने तीन राष्ट्रीय महामार्गांना क्रॉस केले. होशंगाबाद, हरदा, खंडवा आणि बऱ्हाणपूर या चार वनविभागांतील ११ वनपरिक्षेत्रातून भ्रमंती करीत ती मेळघाटमध्ये दाखल झाली. ती मूळची मध्यप्रदेशातील बांधवगड व्याघ्र अभयारण्यातील असून, एक वर्षापूर्वी सातपुडा व्याघ्र अभयारण्यात दाखल झाली होती. तेव्हापासून या वाघिणीचे मॉनिटरिंग सातपुडा व्याघ्र अभयारण्य करीत होते. सॅटेलाइटसोबत कॉलर आयडीचा संपर्क तुटल्यामुळे या वाघिणीचे लोकेशन त्यांना मिळत नव्हते. या वाघिणीने सातपुडा-मेळघाट अशा व्याघ्र भ्रमण मार्गावर शिक्कामोर्तब केले आहे.
मध्यप्रदेशातील सातपुडा व्याघ्र अभयारण्यातील वाघीण अंबाबरवा अभयारण्यात कॅमेरा ट्रॅपमध्ये आढळून आली आहे. आपले नियत क्षेत्र आणि जोडीदाराच्या शोधात ती आली असावी.
- नवल किशोर रेड्डी, उपवनसंरक्षक, आकोट वन्यजीव विभाग
कॉलर आयडी असलेली ही वाघीण बांधवगड व्याघ्र अभयारण्यातून एक वर्षापूर्वी सातपुडा व्याघ्र अभयारण्यात दाखल झाली. सॅटेलाइटशी असलेला तिच्या गळ्यातील कॉलर आयडीचा संपर्क तुटल्यामुळे सिग्नल मिळत नसल्यामुळे तिचे लोकेशन मिळत नव्हते.
- सुशील कुमार प्रजापती, डेप्युटी डायरेक्टर, सातपुडा व्याघ्र अभयारण्य