वरूड : उन्हाळ्यात लग्नसराईची धूम असते. परंतु, यावर्षी कोरोनामुळे लग्नसुद्धा घरातच उरकविण्यात येत आहेत. गतवर्षीदेखील तसेच झाले. लॉकडाऊन व लग्नकार्यास लागलेल्या मर्यादेमुळे बँड पथकालासुद्धा मोठा फटका बसला आहे. तालुक्यातील बँड पथके उपासमारीचे जीणे जगत असून, शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
तालुक्यात ५० पेक्षा अधिक बँडवादक पथक आहेत. या पथकातील सर्वांची उपजीविका याच व्यवसायावर असते. परंतु २२ मार्च २०२० पासून तालुक्यात बँड, तासे, ढोलक्या वाजल्याच नाही. २२ मार्च २०२० पासून तर २५ जून २०२० पर्यंत पूर्णत: लॉक डाऊन होता. नंतर नियम आणि अटींच्या आधारे शिथिलता देऊन काही उद्योगांना परवानगी मिळाली. मात्र, सभागृहे, डेकोरेशन, बिछायत, बँड पथक यापासून वंचित राहिले. सन २०२० ची लग्न सराई लाखो रुपये कमावून देत होती. या बँड वादकाचे हाताखाली २० ते २५ लोक काम करून पोट भरत होते. कोरोनामुळे तेसुद्धा बंद झाले. गणेश उत्सव, दुर्गा उत्सव तसेच लहान मोठे कार्यक्रमातील वाद्य बंद झाले.