अमरावती : शेतकऱ्यांना पाऊस हवाहवासा वाटत असला तरी कृषी कार्यालयात मात्र नकोसा असल्याची स्थिती आहे. याला कारणही विशेष आहे. येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात सध्या ‘टीप टीप बरसा पाणी’ अशी स्थिती ओढवते. यामध्ये कागदपत्रे, कॉम्प्युटर खराब होण्याची शक्यता लक्षात घेता, संपूर्ण कार्यालयाच्या टिनावर प्लास्टिकचे कव्हर टाकण्यात आले आहे.
येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय हे ३० ते ३५ वर्ष जुने आहे व कार्यालयावर लोखंडी व ॲसबेस्टॉसच्या टिनाचे छत आहे. या टिनाला अनेक ठिकाणी भेगा व छिद्र पडली आहेत. त्यामुळे थोडा जरी पाऊस आला तरी टिनाचे छत गळायला लागते. त्यामुळे येथील कृषीच्या सर्व विभागांच्या कक्षावर आता प्लास्टिकचे कव्हर लावण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना गळती थांबली आहे.
सुरुवातीला या इमारतीचा गोडावून म्हणून उपयोग केला जात होता. यानंतर येथे एसएओ कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयाचे छत टिनाचे असल्याने सर्व ऋतूंमध्ये कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. दुरुस्तीसाठी निधीची वानवा असल्याने नव्या इमारतीची सर्वांना प्रतीक्षा आहे.