विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न : विभागीय आयुक्तांना निवेदनअमरावती : गत ६ दिवसांपासून विनाअनुदानित शाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण पुकारले आहे. सोमवारी शिक्षकांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काळ्या फिती लावून मूकमोर्चा काढला. यावेळी शासनाच्या उदासीन धोरणावर अन्यायग्रस्त शिक्षकांनी कठोर ताशेरे ओढले.येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरातून दुपारी २ वाजता निघालेला मूक मोर्चा दुपारी ४ वाजताच्या सुमारास विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहचला. या मूकमोर्चात शिक्षकांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. मूकमोर्चात सहभागी होण्यासाठी अमरावती विभागातून शिक्षक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. मोर्च्याचे नेतृत्व शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, दीपक धोटे, कायम विनाअनुदानित कृती समितीचे पुंडलिकराव रहाटे, नीता गहरवाल, नाशिकराव भगत, विमाशीचे जयदीप कोनखासकर, सुभाष पवार, सुधाकर वाहुरवाघ, सुरेश सिरसाट, गोपाल चव्हाण आदींनी केले. यावेळी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांना अन्यायग्रस्त शिक्षकांनी निवेद सादर करुन आपल्या व्यथा मांडल्या. गत सहा दिवसांपासून विना अनुदानित शिक्षक, कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरु असताना शासन स्तरावर कोणतीही दखल घेण्यात आली नाही, हे शल्य शिक्षकांनी व्यक्त केले. यापूर्वी मुंडन आंदोलन, रक्तदान आता मूक मोर्चा काढून शासन जागे व्हावे, ही अपेक्षा शिक्षकांनी यावेळी वर्तविली. दरम्यान विभागीय आयुक्त राजुरकर यांनी अन्यायग्रस्त शिक्षकांचे प्रश्न, समस्या शासनाकडे त्वरेने कळविल्या जातील, अशी ग्वाही दिली. मूक मोर्चात गाजी जहरोश, अब्दूल राजीक, रोडे सर, सोनखासकर, विनोद इंगोले, नितीन चव्हाळे, माया वाकोडे, रमेश चांदूरकर, अनिल पंजाबी, मनोज कडू, माहेन ढोके, प्रवीण कराळे, अभय ढोबळे, प्रदीप येवले, शरदचंद्र हिंगे यांच्यासह सुमारे ४०० शिक्षक सहभागी झाले होते. उपोषणात सोमवारी १२ शिक्षक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)-हा तर शिक्षणक्षेत्र संपविण्याचा डाव- शेखर भोयरगत १५ वर्षांपासून विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान न देणे म्हणजे शासनाचे शिक्षणक्षेत्र संपविण्याचा डाव असल्याचा आरोप शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर यांनी केला. विनाअनुदानित शाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत १६० वेळा आंदोलन करूनही सरकारला जाग आली नाही. राज्य शासन शिक्षणक्षेत्र संपविण्याचा डाव रचत असेल तर ते कदापिही होऊ देणार नाही, असा इशारा भोयर यांनी दिला आहे.सोमवारी पाच शिक्षकांची प्रकृती खालावलीगत ६ दिवसांपासून बेमुदत उपोषण करीत असलेल्या शिक्षकांपैकी सोमवारी अचानक पाच शिक्षकांची प्रकृती खालावली. त्यांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. प्रकृती खालावल्यामुळे आतापर्यत १५ शिक्षकांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रामेश्वर हिंगणे, सुनील देशमुख, विष्णू मानकर (बुलडाणा) तर आनंदा सोनोने, बाळकृष्ण गावंडे (अकोला) या पाच शिक्षकांना सोमवारी भरती करण्यात आले आहे.
काळ्या फिती लावून शिक्षकांचा मूकमोर्चा
By admin | Published: June 07, 2016 7:34 AM