लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तिवसा, मोर्शी व वरूड तालुक्यांमध्ये गुरुवारी पहाटे अवकाळी पावसादरम्यान गारपीटही झाली. सुमारे तासभर मुसळधार पाऊस कोसळल्याने खरीप-रबी पिकांचे मोठे नुकसान झाले.जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, २१८ बाधित गावांतील २६ हजार ३२४ हेक्टर क्षेत्रावरील पीक व फळपिकांचे नुकसान झाले आहे. धारणी तालुक्यात जिल्हाधिकारी कार्यालयाने शून्य पावसाची नोंद केली असली तरी तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसला. जिल्ह्यात गुरुवारी पहाटे ८ पर्यंत सरासरी १२.४ मिमी पावसाची नोंद झाली. तीन दिवसांपासून अख्खा जिल्हा थंडीने गारठला असताना बुधवारी उशिरा रात्री व गुरुवारी पहाटे अवकाळी पाऊस बरसला. यात संत्रा, केळी, कपाशी, तूर या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले.मोर्शी : तालुक्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत २३.८ मिमी पाऊस कोसळला. तालुक्यातील दापोरी, डोंगर यावली, घोडदेव, पाळा, मायवाडी, सालबर्डी शिवारात पावसासह पाच मिनिटांपर्यंत गारपीट झाली. या परिसरात बोराच्या आकारासारखी गार कोसळल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शिवारातील आंबिया व मृग बहराची संत्री, तूर, कपाशी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.वरूड तालुक्यात गारपीटअमरावती : वरूड तालुक्यातील आमनेर, एकदरा, वाठोडा, घोराड, देवूतवाडा, गणेशपूर, सावंगी, लिंगा, एकलविहीर, पुसला, शेंदूरजनाघाट, सातनूर, रवाळा, तिवसाघाट, टेंभूरखेडा, जरूड, राजूराबाजार, वाडेगाव, गाडेगांव, वघाळ, पवनी, हातुर्णा, लोणी, सावंगा, करजगांव, बेनोडा, बारगाव, जामगाव, गोरेगाव, बहादा या ठिकाणी पाऊस झाला.अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चांदूररेल्वे, अचलपूर, चिखलदरा, धारणी व चांदूर बाजार या ठिकाणी गुरुवारी पहाटेच्या सुमारास अर्धा तास पाऊस झाला. या अवकाळी पावसाने संत्रा, केळी, तूर, कपाशीचे सर्वाधिक नुकसान केले.माझ्या दोन एकर केळीला गारपिटीचा तडाखा बसला. त्यामुळे केळी पूर्णपणे फाटून गेली. तूर, कपाशीलासुद्धा तडाखा बसला आहे. आता मला नुकसान भरपाई देण्यात यावी.- दीपक सावरकर, शेतकरी, शेंदूरजना बाजारपहाटे पडलेल्या गारांचा खच दुपारीदेखील कायम होता. या गारपिटीने कपाशी व तूर पिकाला फटका बसला. आधी अवकाळी पावसामुळे खरीप हंगामात सोयाबीन भिजले. आता पुन्हा रबी हंगामात अवकाळी पावसाने नुकसान केले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.- सागर बोडखे, सरपंच, शेंदूरजना बाजार
२१८ गावे बाधित, २६ हजार हेक्टरमध्ये नुकसानगुरुवारी पहाटे झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे चार तालुक्यांतील २१८ गावांमध्ये २६,३२४ हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये मोर्शी तालुक्यात ५९ गावांतील ४५१३ हेक्टरवरील संत्रा, वरुड तालुक्यात १४० गावांमधील १०,४५९ हेक्टरवरील संत्रा, तिवसा तालुक्यात १७ गावांंमध्ये ३,३२० हेक्टरवरील संत्रा, गहू, तूर, हरभरा व कांदा तसेच चांदूरबाजार तालुक्यात दोन गावांमधील ४६५ हेक्टरवरील तूर व हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तिवसा तालुक्याला गारपिटीचा जबर तडाखातिवसा : तालुक्यात गुरुवारी पहाटे ४ वाजता विजांच्या कडकडाटात मुसळधार अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली. आकाशातून कोसळलेल्या गारी दुपारी १२ वाजेपर्यंत विरल्या नव्हत्या. एवढे सर्द वातावरण तालुक्यात यादरम्यान तयार झाले. या वातावरणाचा खरिपातील तूर, कपाशी, केळी तसेच रबीतील गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला हवामान विभागाने जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीची शक्यता वर्तविली होती. दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण व पाऊस सुरूच होता. त्यात गुरुवारी पहाटे ४ वाजता तालुक्यातील शेंदूरजना बाजारसह निंबोरा देलवाडी, भांबोरा, पालवाडी, वरखेड, धामंत्री, मोझरी, शिरजगाव मोझरी गावांना व शिवाराला गारपिटीचा तडाखा बसला.