फोटो - अमोल २३ पी
अमोल कोहळे
पोहरा बंदी : आगीत बेचिराख झालेल्या पोहरा-चिरोडी अरण्यात सद्या संततधार पावसामुळे सर्वत्र हिरवळ पसरली आहे. या जंगलात विविधरंगी फुलपाखरे आणि अधूनमधून दिसणारे धुके यासोबतच खळखळ वाहणारे झरे हे पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरत आहेत. अमरावतीकर या ठिकाणी पर्यटनासाठी येत आहेत.
अमरावती शहराच्या पूर्व भागाला असलेल्या पोहरा-चिरोडी जंगलात संततधार पावसामुळे सर्वत्र हिरवळ पसरलेली आहे. उन्हाळ्यात हे जंगल आगीत भस्मसात झाले होते. वणवा लागल्याने हा परिसर असा परत हिरवागार होईल, असे वाटत नव्हते. परंतु, पावसाळा सुरू होताच सर्वदूर हिरवळ पसरली आहे. जंगलातील डोंगरदऱ्या मऊ गवताने फुलून गेल्या आहेत. झाडांना नवी पालवी फुटली असून निसर्गरम्य वातावरणात विविधरंगी फुलपाखरांचा मुक्त संचार सुरू आहे. नागमोडी वळणाचे रस्ते, सावंगा तलावाचे विहंगम दृश्य, जंगलातील खळखळ वाहणारे झरे हे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. पोहरा जंगलाजवळच सावंगा तलाव असल्याने येथे सुद्धा पर्यटकांची दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते आहे. या अरण्यात बिबट, हरिण, सांभर, निलगाय, चित्तळ, चिकारा, रानडुक्कर, मोर, ससे यासारखे वन्य प्राणी मुक्त संचार करतात. जंगलात आल्हाददायक वातावरण असल्याने पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू आहे. आठवड्याच्या प्रत्येक रविवारी हा जंगल पर्यटकांच्या गर्दीने फुलून जातो.