अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या २०२३-२०२४ उन्हाळी परीक्षांना १० एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी शुक्रवार, ३१ मार्च हा शेवटचा दिवस असून, यानंतर अर्ज सादर करण्याला मुदतवाढ मिळणार नाही, अशी माहिती परीक्षा विभागाने दिली आहे. ५० रुपये विलंब शुल्क आकारून परीक्षा अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनानुसार, परीक्षांपासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी २६ ते ३१ मार्च या कालावधीत उन्हाळी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने विद्यापीठ प्रशासनाने लिंक सुरू केली आहे. ३१ मार्च रोजी ही लिंक बंद होणार असून, त्यानंतर उन्हाळी परीक्षांचे अर्ज सादर करत येणार नाहीत.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ऑनलाइन अर्जाची तपासणी करून या अर्जाची यादी १ एप्रिल रोजी महाविद्यालयात शुल्कासह जमा करावी लागणार आहे. बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा १० एप्रिल ते ३ मे २०२३ या दरम्यान घेण्यात येणार आहेत. ३० एप्रिल ते १० मे २०२३ या दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे तर नियमित प्रवेशित विद्यार्थ्यांच्या परीक्षा ११ ते ३१ मे २०२३ या कालावधीत होणार आहेत. अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा व अकोला या पाचही जिल्ह्यांत १८० महाविद्यालयांतील केंद्रात परीक्षा होतील. कला, वाणिज्य, विज्ञान, फार्मसी अशा शाखांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे पावणे तीन लाख विद्यार्थी उन्हाळी परीक्षा देतील, अशी माहिती आहे.३१ मार्च ही ऑनलाइन परीक्षा अर्ज सादर करण्याची शेवटची संधी आहे. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना अर्जाची हार्ड कॉपी महाविद्यालयात जमा करणे अनिवार्य असणार आहे. ५० रुपये विलंब शुल्क भरावे लागणार आहे.
- मोनाली वानखडे-तोटे, प्रभारी संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ