मुदत संपुष्टात : एक वर्षापर्यत अंमलबजावणीअमरावती : महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ सोमवार ३१ आॅगस्ट रोजी संपुष्टात आल्याने प्राधिकरणाला कोणतेही धोरणात्मक निर्णय एक वर्षांपर्यंत घेता येणार नसल्याचा अध्यादेश संत गाडगेबाबा अमरावतीला प्राप्त झाला. त्यामुळे मंगळवार १ सप्टेंबरपासून विद्यापीठातील सर्व अधिकार कुलगुरुकडे राहणार आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद, सिनेट, विद्वत परिषद आदी प्राधिकरणाचा कार्यकाळ ३१ आॅगस्ट २०१५ रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे ३१ आॅगस्ट २०१६ पर्यंत विद्यापीठाच्या प्राधिकरणाला धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. विद्यापीठातील नियमित कामे सुरु राहणार असून कोणत्याही निवडणुका विद्यापीठाला घेता येणार नाहीत. तसेच २३ फेब्रवारी २०१६ रोजी कुलगुरुपदाची मुदत संपत आहे. त्यामुळे नवीन कुलगुरू निवडीचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही वर्षांपूर्वी कुलगुरुचा कार्यकाळ संपल्यावर त्यांचे प्रभारी पद विभागीय आयुक्तांकडे सोपविण्यात आले होते. मात्र, यापुढे विभागीय आयुक्तांनाकडेही पदभार सोपविता येणार नाही, असा निर्णय आहे. त्यामुळे पुढील कार्यकाळात कुलगुरुंना मुदतवाढ मिळण्याचे संकेत आहे.
आजपासून सर्व अधिकार विद्यापीठांच्या कुलगुरुकडे
By admin | Published: August 31, 2015 11:59 PM