लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या विदर्भातील ऐतिहासिक बहिरम यात्रेवर टोलचे सावट पसरले आहे. यात्रेकरूंसह ग्रामस्थांना यापुढे टोल भरावा लागेल. त्याचा फटका गोरगरीब आदिवासींना बसणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरणारी यात्रा उद्ध्वस्त होण्याचीदेखील भीती निर्माण झाली आहे.बहिरम यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा आहे. ही यात्रा अंजनगाव ते बैतुल मार्गाच्या दुतर्फा भरते. केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्रालयाने या मार्गाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेतले आहे. १४ जून २०१७ रोजी दिलेले २७० कोटींचे कंत्राट दोन वर्षांत पूर्ण करायचे आहे. रस्त्याच्या नव्या कामामुळे रुंदी ६० फूट होणार असल्याने वनविभागाचा नाका, मनकर्णा विहीर, पंचायत समितीची इमारत पाडली जाणार आहे. यात्रेदरम्यान लागणाऱ्या दुकानांचा प्रश्नही निर्माण होणार आहे.दरम्यान टोल नाका यात्रा परिसर सोडून बैलबाजाराच्या पुढे किंवा आरटीओ चेक पोस्ट परिसरातच मोकळ्या जागेत टोल नाका उभारून वसुली करावी. रस्ताच यात्रेच्या मागच्या बाजूने वळता करीत तिरंगा सभागृह व रेस्ट हाऊससमोरून पुढे न्यावा, जेणेकरून यात्रेचे स्वरूप अबाधित राहील, असे ग्रामस्थांनी सुचविले आहे. टोल नाक्याचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणीदेखील जोर धरत आहे.यात्रेवर डोळाबहिरम यात्रा डोळ्यांपुढे ठेवून त्याच्या अगदी जवळ टोल नाका प्रस्तावित करण्यात आला आहे. या टोलकरिता गट क्रमांक ४३३ मधील खासगी शेतजमिनीची मोजणी महामार्ग अधिकाऱ्यांनी नुकतीच केली. मार्गावर टोलचे संकेत पिवळ्या पेंटने स्पष्ट केले आहेत.
टोल नाक्यासंदर्भात पाहणी करताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी.