अमरावती : पहिल्या पत्नीशी फारकत झाल्याची बतावणी करून तरुणीशी संसार थाटणाऱ्या पतीने तिला चाकूच्या धाकावर विवस्त्र करून लैंगिक अत्याचार केल्यानंतर घटस्फोटाच्या प्रतिज्ञापत्रावर तिची स्वाक्षरी घेतली. ही धक्कादायक घटना नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह त्याचे आई-वडील आणि तीन बहिणींविरुद्ध गुन्हा नोंदविला.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३० वर्षीय तरुणीशी लग्न करण्यासाठी आरोपी संदेश रामदास वाकपांजर (३२) सह आई-वडील व तीन बहिणींनी कट रचला. पहिल्या पत्नीसोबत सोडचिठ्ठी झाल्याची बतावणी करून संदेशने तिच्याशी लग्न जुळविले. २० ऑगस्ट २०२० रोजी नोंदणी पद्धतीने दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर संदेशने तिच्या इच्छेविरुद्ध तिला विवस्त्र केले आणि चाकूचे वार करून संपविण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर १६ डिसेंबर २०२० रोजी घटस्फोट घेत असल्याचे सांगून संदेशने प्रतिज्ञापत्रावर पीडितेची स्वाक्षरी घेतली. या घटनेनंतर पीडित ही आई-वडिलांकडे परतली. पीडिताने तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाबाबत कायदेशीर कारवाईसाठी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कविता पाटील करीत आहेत.