अमरावती : ‘कुष्ठरोगाविरुद्ध अखेरचे युद्ध' या घोषवाक्याच्या साह्याने आरोग्य विभागातर्फे 'स्पर्श' जनजागृती अभियान राज्यभरात राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृतीसाठी २६ जानेवारी रोजी एकाच वेळी ग्रामसभा, तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रतिज्ञा वाचन होणार आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत जनजागृतीकरिता विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्याचे वाटप स्पर्श जनजागृती अभियानाचे पर्यवेक्षण करण्याच्या सूचना दिल्या जातील. २६ जानेवारीच्या ग्रामसभेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाचे वरिष्ठ अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंचांमार्फत वाचन होईल.
कुष्ठरोग, क्षयरोग निर्मूलनाबाबत प्रतिज्ञा, विद्यार्थ्यांसह गावातील प्रौढ व्यक्तींमार्फत अॅक्टिव्हिटीद्वारे जनजागृती, उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. हा उपक्रम जिल्ह्याचे सहायक संचालक, जिल्हा क्षयरोग अधिकारी व शहर क्षयरोग अधिकारी यांच्या मार्गदर्शनात अशासकीय समाजसेवी संस्था, आंतरराष्ट्रीय समाजसेवी संस्था, रोटरी क्लब, लायन्स क्लब आदी संस्था कुष्ठरोग निवारण दिनी या आजाराविषयी उपचार व निदानाबाबत शास्त्रीय माहिती देणार आहे.यांचा राहणार सहभाग
सदर उपक्रम पंचायत समिती, ग्रामपंचायत, ग्रामविकास, नागरी विकास, माता व बाल संगोपन केंद्र, सामाजिक न्याय विभाग आदी विभागांच्या सहकार्याने व वैद्यकीय अधिकाºयांच्या मार्गदर्शनात राबविला जाणार आहे. यासाठी समितीदेखील गठित झाली आहे. जिल्हाधिकारी समितीचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी उपाध्यक्ष, सहायक संचालक सदस्य सचिव, तर जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा क्षयरोग अधिकारी, शहर क्षयरोग अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी, जिल्हा साथरोग अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जिल्हा आशा समन्वयक व स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी सहभागी राहतील. तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष गटविकास अधिकारी राहतील.कुष्ठरोगाचे समूळ नष्ट करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात 'स्पर्श' जनजागृती अभियानांतर्गत २६ जानेवारी रोजी सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय संस्थांमध्ये प्रतिज्ञा वाचन होईल. या उपक्रमात नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.- डॉ. अंकुश शिरसाट, जिल्हा कुष्ठरोग निर्मूलन अधिकारी