फोटो - वादळाचा सिंगल कॉलम इंटरनेटवरून घ्यावा
वादळाने नुकसान, महसूल विभागाचा भोंगळ कारभार, नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत
वरूड : गत एप्रिल-मेमध्ये राज्यात आलेल्या तौक्ते वादळाच्या नुकसानाची सर्वाधिक भरपाई वरूड तालुक्याला जाहीर करण्यात आली होती. पण, त्याचे वितरण अद्याप झालेले नाही. मदतीच्या प्रतीक्षेत असलेले नुकसानग्रस्त महसूल विभागाचा कारभार भोंगळ असल्याचा आरोप करीत आहेत. दुसरीकडे प्रशासनाने बँक खाते नसल्याने उशीर लागत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
अमरावती जिल्ह्यातील अमरावती, चांदूर बाजार, वरूड, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी आणि अचलपूर या सहा तालुक्यांचा तौक्तेच्या नुकसानग्रस्तांच्या यादीत समावेश आहे. या तालुक्यांसाठी २ कोटी ९१ लाख २१ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले. सर्वाधिक २ कोटी ५८ लाख ९४ हजार रुपये अनुदान वरूड तालुक्याला प्राप्त झाले. जिल्ह्यातून सर्वाधिक निधी वरूडला मिळाला. ३० जूनला अनुदान निधी प्राप्त झाल्यानंतर एक महिना लोटूनही नुकसानग्रस्तांना रक्कम मिळाली नाही.
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून वितरित करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या आदेशावरून जिल्ह्याकरिता वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता अनुदान निधीचे वाटप करण्यात आले. यामध्ये मनुष्यहानी, जखमी तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्णतः क्षतिग्रस्त झाली असल्यास कपडे तसेच घरगुती भांडीकरिता राज्य आपत्ती दराने १ लाख ५५ हजार रुपये, वाढीव दराने ५५ लाख ४५ हजार रुपये , पूर्णतः नष्ट , अंशतः पडझड झालेली कच्ची , पक्की घरे , नष्ट झालेल्या झोपड्या व गोठ्याकरिता अनुदान राज्य आपत्ती दराने ६१ लाख ८२ हजार १०० रुपये, वाढीव दराने ६५ लाख ५२ हजार ९०० रुपये, शेतीपिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानाकरिता मदत राज्य आपत्ती दराने १८ लाख ७२ हजार रुपये, वाढीव दराने ३३ लाख २८ हजार रुपये, मोफत केरोसीन व अन्नधान्य वाटपाकरिता निधी २२ लाख ५९ हजार रुपये असा एकूण २ कोटी ५८ लाख ९४ हजार रुपये तौक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्त निधी तहसील कार्यालयाला प्राप्त झाला आहे. दरम्यानच्या कालावधीत भरपाई रकमेसाठी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवून नागरिकांची दमछाक होत आहे.
--------------------
तौक्ते चक्रीवादळात नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतीचा निधी प्राप्त झाला. सदर मदतीचे वाटप करताना बँकांतील खातेक्रमांक मिळविताना तसेच तर काहींचे बँक खातेच नसल्याने अडचणी आल्याने विलंब झाला. आता मदत निधीचे वाटप सुरू करणार आहे.
- देवानंद धबाले, नायब तहसीलदार