मोर्शीत निसर्गरम्य वातावरण : वनविभागाच्या मेहनतीने केंद्रातील झाडे हिरवीकंचमोर्शी : निसर्ग वनपर्यटन केंद्राच्या स्थापनेस एक वर्ष पूर्ण झाले. एका वर्षापूर्वी लावलेली सर्व झाडे जिवंत ठेवण्यात वनविभागाला यश प्राप्त झाले. प्रत्यक्षात आर्थिक लाभाशिवाय पर्यावरण रक्षणासोबतच तीन हजार झाडांपासून मिळणारा प्राणवायू हा अप्रत्यक्ष लाभ मोर्शी परिसराला प्राप्त झाला आहे.शहराला लागून असलेल्या २७ एकर वनभूमीवर तत्कालीन येथील वन परीक्षेत्र अधिकारी अशोक कविटकर यांच्या संकल्पनेतून निसर्ग पर्यटन केंद्राची निर्मीती करण्यात आली. त्या करीता राज्यशासना सोबतच वन विभाग, आणि महाराष्ट् पर्यटन विकास महामंडळाने आर्थिक सहकार्य पुरविले होते. या वन पर्यटन केंद्रात वनपरिक्षेत्रात प्रामुख्याने आढळणाऱ्या तथापि नामशेष होऊ पाहणाऱ्या विविध प्रजातींची झाडे लावण्यात आली. सोबतच चक्क आसाम सारख्या राज्यात प्रख्यात असलेल्या बांबूच्या विविध प्रजातींचे रोपण करण्यात आले. शिवाय औषधी उपयोगी वनस्पतींकरिता वेगळया नेट शेडची व्यवस्था करून त्यात वनौषधी लावण्यात आलेल्या आहेत. वन पर्यटन केंद्रात तीन हजार झाडे मागील वर्षी लावण्यात आली. मुलांकरिता पर्यटन केंद्रात मुंबईच्या दर्जाचे विविध साहसी खेळणी बसविण्यात आलेले आहे. शिवाय विविध जंगली श्वापदांची ओळख पर्यटकांना व्हावी म्हणून बंगलोर येथील मुर्तीकारांना बोलावून त्यांच्याव्दारे निर्मित विविध जनावरांच्या सजीव वाटणारे जनावरांचे पुतळे बसविण्यात आले. या वनपर्यटन केंद्राचे उद्घाटन मागील वर्षी नोव्हेंबर महिण्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले होते. मागील एक वर्षात या वन पर्यटन केंद्राचा मागोवा घेतला असता, लावलेले तिन हजार झाडे जीवंत ठेवण्यात पर्यटन केंद्राच्या अधिकाऱ्यांना यश प्राप्त झाले. वृक्षांची वाढसुध्दा लक्षनीय दिसून येते. येणाऱ्या तीन वर्षात संपूर्ण वन पर्यटन केंद्र डेरेदार वृक्षांनी बहरुन येइल असा विश्वास अधिकाऱ्यांना वाटतो.दीड लाखांपेक्षा अधिक पर्यटकांची भेट !वनपर्यटन केंद्राच्या उद्घाटनानंतर एका वर्षात १ लक्ष ५७ हजार २९० पर्यटकांनी या स्थळाला भेट दिली. ७४ शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहल काढून या वनपर्यटन केंद्राला भेट दिलेली आहे. या वनपर्यटन केंद्रात प्रवेश करणाऱ्यांकडून उद्घाटनानंतर प्रत्येकी १० रुपये शुल्क आकारण्यात येत होते. आता प्रत्येकी २० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. एका वर्षात १६ लक्ष ९५ हजार ३४० रुपये पर्यटकांमुळे प्राप्त झाले असून जवळपास ५ लक्ष ७० हजार रुपयांचा खर्च झालेला आहे.आधुनिकतेचा ध्यास उद्घाटनानंतर वनपर्यटन केंद्रातील प्रवेश शुल्काच्या पावत्या छापील होत्या. आता संगणकीय तिकीट प्रणाली सुरू करण्यात आली. त्यामुळे लागणारा कागद कमी प्रणाणात वापरला जात आहे. दैनंदिन, मासिक आणि वार्षिक हिशेबसुध्दा एकाचक्षणी मिळण्याची सोय झाली. ही प्रणाली इंटरनेट व्दारा जोडण्यात येणार आहे.जिल्हा मुख्यालयातील अधिकाऱ्यांनासुध्दा या केंद्रातील व्यवहाराची माहिती प्राप्त होऊ शकेल.एक कोटीचा प्रस्ताव वनपर्यटन केंद्रात ठिकठिकाणी सौर ऊर्जेवर चालणारे पथदिवे लावण्यात आले आहेत. त्यांची संख्यावाढीसोबतच सध्या अप्पर वर्धा धरणातून पारंपरिक विजेवर आधारित मोटारपंपाव्दारे पाणी उचल केले जाते. ही व्यवस्था बदलण्याचा मानस वन विभागाने केला असून सौर ऊर्जेवर चालणारे मोटारपंप लावण्याचे प्रस्तावित केले आहे. याशिवाय या केंद्रात मोफत वायफायची सोय आणि नवीन काही जंगली श्वापदांचे पुतळे बसविण्याचे प्रस्तावित आहे.
निसर्ग वनपर्यटन केंद्र बनले पर्यटकांचे आकर्षण
By admin | Published: November 23, 2015 12:21 AM