अमरावती : दिवाळी आता आठ दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील बाजारपेठेत चैतन्य पसरले आहे. शहरातील दुकाने फुलली आहेत. रेडिमेड कापडासह फराळाच्या साहित्याला लोकांची मागणी वाढली आहे.
कोरोनाचे सावट कायम असताना नवरात्रोत्सव सामान्यांसाठी नवउत्साह घेऊन आला, तोच उत्साह दिवाळीमध्ये कायम असणार आहे. वाढत्या महागाईमुळे प्रत्येक वस्तूंचे भाव वाढल्याची प्रतिक्रिया सामान्य वर्गातून मिळत आहे. खासकरून महिला वर्गाला लागणाऱ्या पूजासाहित्यांचे भावसुध्दा वाढल्याची प्रतिक्रिया महिला वर्गातून होत आहे. लक्ष्मीपूजनाच्या साहित्यांचे स्टॉल बाजारात सजले आहेत. दिवाळीकरिता लक्ष्मीपूजनातील महत्त्वाचे साहित्य म्हणजे 'केरसुणी'. ही लक्ष्मीपूजनात सर्वात महत्त्वाची मानली जाते. दिवाळी खरेदीची सुरुवात करताना सर्वात आधी खरेदीचा मान या केरसुणीला मिळतो, तशी प्रथा आहे.
मात्र, यंदा केरसुणीच्या किमती वाढल्याने लक्ष्मीपूजनातील लक्ष्मी महागली अशी प्रतिक्रिया महिला वर्गाकडून येत आहे. केरसुणी बनविणारे कारागीर हे बहुधा छत्तीसगढ येथील असतात. यावर्षी सततच्या पावसामुळे केरसुणी बनविण्याकरिता लागणारे झाडांचे पत्तेही उशिरा प्राप्त झाले. त्या कारणाने केरसुणी या कमी प्रमाणात बनविण्यात आल्या. त्या कारणाने बाहेरील शहरातून केरसुणी या शहरात आल्या. साहजिकच येण्यासाठी लागणाऱ्या वाहतूक खर्चामुळे केरसुणीचे भाव वाढले. अमरावती शहरात इंदौर येथून केरसुणी विकण्यास येतात. बाजारात केरसुणीच्या किमती या ७० रुपये जोडी ते १०० रुपये जोडी विकल्या जात आहेत, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
अमरावती शहरात केरसुणी बनविणारे कारागीर हे दिवाळीपूर्व दाखल होतात. ते आपल्या कुटुंबासह छत्री तलाव परिसरातील भागात राहतात व तेथील जंगलातूनच ते लागणारे साहित्य गोळा करतात. यावेळी मात्र कारागीर हे कमी असल्याने केरसुणी कमी प्रमाणात बनविण्यात आल्या. त्या कारणाने बाजारभाव वाढले, असे कारागीर म्हणाले.