नरेंद्र जावरे
चिखलदरा (अमरावती) :मेळघाटातील आदिवासींची संस्कृतीच वेगळी आहे. त्यांचे वेगळे असे अवकाश आहे. आदिवासी कोरकू समाजात होळी हा सर्वांत महत्त्वाचा असला तरी मेळघाटातील गायकी गोंड बांधव दिवाळी पर्वावर गुरांसोबत खेळण्यापासून, तर बासरी-ढोलकीच्या तालावर नृत्य करून दिवाळी सण साजरा करतात. दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू झालेल्या या पर्वात बुधवारी चुरणी व गुरुवारी काटकुंभ येथे थाट्या बाजार भरला.
मेळघाटात गुराख्याला थाट्या म्हणतात. गायकी गोंड समाजबांधव वर्षभर गावातील गुरे चारण्याचे काम करतात. मोबदल्यात पशुपालकांकडून ठरलेला वार्षिक व्यवहार असतो. त्यावर त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक डोलारा चालतो. दिवाळी सणाच्या पर्वावर मेळघाटच्या पाड्यांमध्ये ढोलकी-बासरीच्या स्वरात थाट्यांचे थिरकणारे पाय आणि गावकऱ्यांची साथ उत्साहात भर घालणारी असते. कोरोनामुळे या उत्सवावर विरजण पडले होते.
गोधनी काढून दिवाळी सण
गावातील गुराढोरांची चराई करीत असल्याने या मुक्या प्राण्यांचा गायकी गोंड बांधवांना जिवापाड लळा असतो. दिवाळीच्या दिवशी पशुपालकाच्या घराच्या भिंतीवर चुन्याने रंगवून गेरूने गोधनी काढली जाते. त्या गुरांना थाट्याकडून खिचडा खाऊ घातला जातो. मोबदल्यात काही पशुपालकांकडून त्यांना सुपात घरातील धान्य देण्याची प्रथा आजही आहे. दिवाळीच्या पाच दिवसांत थाट्या गावातील गुरे चराईसाठी नेत नाहीत, हे विशेष. कोरडा, कोयलारी, कोटमी, बगदरी, काजलडोह, डोमा, बामादेही आदी गावांत या प्रथेला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे.
गेरूनंतर थाट्या बाजाराची धूम
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गावातून गुराखी ढोलकी-बासरीच्या तालात नाचगाणी करतात. त्याला गेरू असे म्हणतात. यानंतर तालुक्यात भरणाऱ्या मोठ्या आठवडी बाजारात थाट्या बाजाराची धूम सुरू आहे. या बाजारात मोठया संख्येने हे समाजबांधव एकत्र येऊन नाचगाणे करतात. मेळघाटची ही परंपरा बदलत्या संस्कृतीत आजही सुरू आहे. गुरुवारी काटकुंभ येथे बाजारात थाट्यांचे नाचगाणे रंगले होते.