पालिकेला मिळेना दुरूस्तीचा मुहूर्त : नागरिकांचा जीव धोक्यात चांदूरबाजार : शहरातील मुख्य बाजारपेठेमधील नगरपालिका प्रशासनाच्या व्यापारी संकुलातील बुडातून पूर्णत: तुटलेल्या जिन्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक अद्यापही सुरूच आहे. जिना दुरुस्तीबाबत पालिकेला वारंवार पत्रव्यवहार करूनही कुंभकर्णी झोपेतील पालिका प्रशासन या जिन्यामुळे मोठी घटना घडल्यावरच जागे होणार काय, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकातर्फे वर्तविली जात आहे.नगरपालिकाच्या मालकीचे नेताजी चौकातील नेताजी सुभाषचंद्र बोस व्यापारी संकुलात दोन्ही माळ्यावर एकूण ७२ दुकाने आहेत त्यामुळे हे व्यापारी संकुल नेहमीच वर्दळीचे असते. आठवडी बाजाराला तर या संकुलाच्या परिसरात ग्रामीण दुकानदार मोठ्या प्रमाणात दुकाने थाटतात. या व्यापारी संकुलाचा पहिल्या माळ्यावर मोठ्या प्रमाणात सायबर कॅफे, पाठ्यपुस्तकांचे दुकान व मोबाईलची दुकाने आहेत. त्यामुळे या संकुलात दररोज शेकडो विद्यार्थी ये-जा करतात. मात्र या संकुलाच्या पहिल्या माळ्यावर ये-जा करण्याकरिता असलेला जिना गेल्या काही महिन्यांपासून बुडातून पूर्णत: सडून तुटलेला आहे. हा जिना उभारताना केवळ दोन खांबांवर पूर्ण जिना उभारण्यात आला होता. त्याकरिता लोखंडी पोल जमिनीत गाडण्यात आले.मात्र काही वर्षांतच ही दोन्ही खांब गंजून सडल्याने पूर्णत: तुटलेली आहे. आता हा जिना फक्त पहिल्या माळ्यावर असलेल्या दोन लोखंडी अँगलवर टिकून असून हा कधी कोसळणार याची मात्र निश्चिती नाही. या जिन्यावर चढताना संपूर्ण जिना हालतो. याबाबत परिसरातील नागरिकांनी अनेकदा पालिका प्रशासनाला माहिती दिली. याची गंभीर दखल घेत तत्कालीन मुख्याधिकारी मेघना वासनकर यांनी अभियंता करीम यांना तत्काळ दुरूस्तीचे आदेश दिले होते. मात्र अभियंत्याचा कामचुकारपणामुळे अद्यापही या तुटलेल्या जिन्याची दखल पालिका प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरुद्ध असंतोष खदखदत आहे. या जिन्यावरून दररोज शेकडो विद्यार्थी, नागरिक वाहतूक करतात. या तुटलेल्या जिन्यावरून या नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन वाहतूक करावी लागत आहे. हा जिना कधी कोसळणार व यामध्ये परिसरातील नागरिकांना उद्भवत असलेल्या धोक्याची वाट तर पालिका प्रशासन पाहत नाही ना, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील व्यापाऱ्यांतर्फे केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)संकुलातील हा जिना पूर्णत: तुटल्याचे पालिकेला माहिती असूनही या जिन्यावरून वाहतूक करताना जिव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. यांची तत्काळ दुरूस्ती करणे आवश्यक असून यामुळे मोठी घटना टळू शकते.- पंकज मोहोड, स्थानिक व्यापारी
तुटलेल्या जिन्यावरून वाहतूक
By admin | Published: February 25, 2017 12:12 AM