फोटो पी २१ चांदूर बाजार
चांदूर बाजार : जिल्हा प्रशासनाने कडक संचारबंदी पुकारली असली तरी शहरातील बाजारपेठेत अनेक व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यंगस्टार चौकात मोठ्या प्रमाणात फळ व भाजीपाला विक्रेत्यांची दुकाने लागल्याने संचारबंदी संपुष्टात आली की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. हा सर्व प्रकार बघता, तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखला जाणार, असा प्रश्न स्थानिक नागरिकांतर्फे उपस्थित केला जात आहे.
जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदीचे आदेश लागू केले आहे. ही संचारबंदी अधिक कठोरपणे राबविण्यात यावी, याकरिता पेट्रोल पंप व जीवनावश्यक वस्तूंची दुकानेसुद्धा बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशाला झुगारून अनेक व्यावसायिक, फेरीवाले, भाजीपाला व फळविक्रेते दोन दिवसांपासून यंगस्टार चौक ते महादेव मंदिर परिसरात दुकाने थाटत आहेत. येथे भाजीपाला व फळ विक्रेत्यांची २० ते २५ दुकाने लागत असल्याने या परिसरात खरेदी करण्यासाठी मोठी झुंबड उडत आहे. या गैरप्रकारामुळे परिसरात रस्ता संकीर्ण झाला असून, या मार्गावर होणारी वाहतुकीचा फज्जा उडाला आहे. नागरिक रस्त्यावर उतरून संचारबंदीचा फज्जा उडवित आहेत. अनेक फळ व भाजीपाला विक्रेते पोलीस व पालिका प्रशासनाला न जुमानता सर्रास व्यवसाय करताना दिसत आहे. यावर निर्बंध घालण्यास पालिका प्रशासन कमी पडत असून, पोलिसांचा मदतीशिवाय या दुकानदारांवर कारवाई करणे कठीण होत असल्याची माहिती पालिका कर्मचाऱ्यांनी दिली.
कारवाई व्हावी
शहरात अनेक दुकानदार आपला व्यवसाय लपून-छपून करीत असून, यावर पालिका प्रशासन सातत्याने कारवाई करीत आहे. मात्र, हातगाडीवर फळ व भाजीपाला दुकानदार आपला व्यवसाय सर्रास थाटात असल्याने पालिका प्रशासन याच्यावर कार्यवाही करण्यास धजावत नाही. मंगळवारी सकाळी यंगस्टार चौकामध्ये हातगाडी दुकानदारांनी आपली दुकाने थाटली असता, नायब तहसीलदार देवेंद्र सवाई, तहसील कर्मचारी नीलेश फुटाणे व एक पोलीस शिपाई या दुकानदारांना हटविण्यास धडकले. पालिका प्रशासनाचे या कामासाठी नेमलेले आठ कर्मचारी पोलिसांच्या प्रतीक्षेत ठाण्यात बसले होते. या गंभीर बाबीकडे तालुका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.